
अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला होता. परंतु याबाबत संजय दत्तला विचारणा केली असता त्याने हा दावा फेटाळून लावला आहे. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचा खुलासा संजय दत्त याने केला आहे. ‘एएनआय’ या वृत्त संस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रासप’मध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताबाबत संजय दत्ताला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने हे वृत्त फेटाळले. मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. महादेव जानकर हे माझे मित्र असून ते मला भावासारखे आहेत. मी त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे संजय दत्त म्हणाला.
Sanjay Dutt on reports of him joining Rashtriya Samaj Paksha ahead assembly elections: I will not be joining any political party. Mr Jankar (Maharashtra minister Mahadev Jankar) is a dear friend & brother of mine and I humbly wish him good luck for his future endeavours. pic.twitter.com/hvgBe1s1aX
— ANI (@ANI) August 26, 2019
याआधी शिवाजी पार्क येथील रासपच्या मेळाव्यात संजय दत्त पक्षप्रवेश करणार होता, परंतु काही कारणास्तव तो येऊ शकला नाही असेही जानकर यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे या मेळाव्यात संजय दत्तच्या शुभेच्छांची चित्रफीत दाखविण्यात आली होती. आता मात्र हा दावा फोल असल्याचे उघड झाले.



























































