
मुंबईच्या स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट (एसआयडी) विभागातून रायगडात बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटला आता वाचा फुटली आहे. या सुसाईड नोटमध्ये मुंबईतील एका ज्येष्ठ आयपीएस महिला अधिकाऱयासह काही जणांची नावे असल्यानेच रायगड पोलिसांनी गेल्या दहा दिवसांपासून ही सुसाईड नोट दाबून ठेवल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठांच्या जाचामुळे मानसिक दडपणात असलेल्या कणेरकरांनी लिहिलेल्या या सुसाईड नोटमधील ती आयपीएस महिला अधिकारी कोण, आणखी कुणाची नावे त्यात आहेत, सुसाईड नोटमधील मजकूर जाहीर का केला जात नाही याबाबत मोठा संशयकल्लोळ निर्माण झाला असून रायगड पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱयात सापडला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर हे कुलाबा मुंबई येथील एसआयडी विभागात गेली 15 ते 20 वर्षे कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी कणेरकर यांची रायगड जिह्यात बदली करण्यात आल्यामुळे ते प्रचंड दडपणाखाली होते. कणेरकर यांना पोलीस ठाण्यातील कामाचा कोणताच अनुभव नव्हता. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी त्यांची अर्ज शाखेत बदली केली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी मित्राला सांगितले
प्रशांत कणेरकर हे अलिबागमध्ये डय़ुटीवर रुजू झाले आणि त्यानंतर पंधरा दिवस रजा टाकून ते दादर येथील आपल्या घरी गेले. यावेळी त्यांनी त्यांच्या मित्राला बदली प्रकरणातील मानसिक त्रासाबद्दलची परिस्थिती सांगितली आणि आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखवले होते, मात्र मित्राने टोकाची भूमिका घेऊ नकोस असा सल्ला त्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
आधी कुटुंबाला वेळ दिला, मग आत्महत्या केली
सुट्टीच्या काळात कणेरकर यांनी कुटुंबाला वेळ दिला, त्यांना सैर घडवली आणि 14 ऑगस्ट रोजी ते कामावर रुजू झाले व अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे 16 ऑगस्ट रोजी त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबाला सुसाईड नोट दाखवण्याच्या नावाखाली चालढकल
कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती टेबलवर ठेवली. एरवी इतर प्रकरणांत सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांची झाडाझडती आणि चौकशी करून त्यांना लागलीच ताब्यात घेण्यात येते किंवा अटक करण्यात येते, परंतु कणेरकरांच्या आत्महत्येला दहा दिवस उलटून गेले तरी सुसाईड नोटबद्दल रायगड पोलीस अवाक्षर काढत नाहीत. या सुसाईड नोटमध्ये छळ करणाऱया एका आयपीएस महिला अधिकाऱयासह काही बडय़ा अधिकाऱयांची नावे कणेरकरांनी लिहिली असल्यानेच रायगड पोलीस हे प्रकरण दाबत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. कणेरकरांच्या कुटुंबाला सुसाईड नोट दाखवण्यात येणार आहे असे सांगत पोलीस पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. छळ करणारे ते वरिष्ठ अधिकारी कोण, सुसाईड नोटमध्ये नेमकी कुणाची नावे आहेत, कुणामुळे कणेरकरांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला, असा सवाल विचारला जात आहे.
प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली ती तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या सुसाईड नोटमध्ये काही लोकांची नावे जरूर आहेत. याबाबत तपास सुरू आहे. कणेरकर यांच्या कुटुंबाला ही नोट दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी ती कुणालाही देता येणार नाही.
– अनिल पारसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक


























































