
औसा तालुक्यातील उटी बुद्रुक येथील अज्ञात रोगाने सात जनावरे दगावली आहेत. या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांना या रोगाची कल्पनाही नाही, असं निदर्शनास आलं आहे. वाऱ्याच्या इन्फेक्शनमुळे हा आजार झाल्याचे सांगितलं जात असून त्यामुळे सात जनावरे दगावली आहे.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जाग झाली व लसीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. गावातील अमृता कारभारी कांबळे यांची गाय, मारुती केरबा गवळी यांची गाय, राजेंद्र इंगळे यांची कालवड, कुंडलिक मल्हारी पवार यांची म्हैस, हनुमंत गोविंद सूर्यवंशी यांचा बैल व पंढरी दादाराव शिनगारे यांची कालवड ही सात जनावरे दगावली आहेत. या परिसरात दुष्काळी सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पशुधन संभाळ कसे सांभाळावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असतो. त्यातच हा अज्ञात आजाराने जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या भागात अर्धा पावसाळा संपला तरी जनावरांसाठी चारा व पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनला असताना या परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये या अज्ञात रोगाने जनावरे दगावत असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत दिसत आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उशिरा जाग आल्याने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. एकंदरीत या रोगाची लागण अधिक प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आजारावर उपाययोजना झाली नाही तर शेतकऱ्यांना व शेतमजुरांना या आजारापासून निश्चितच मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

























































