
निसर्गाच्या असमतोलपणामुळे मराठवाडा विभागाला सतत दुष्काळाला समोरे जावे लागत आहे. हा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उचलून ते मराठवाड्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कुठल्याही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहरातील रस्त्यांसाठी 200 कोटींचा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी शहरात आली. यानिमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
दुष्काळ हा मराठवाड्याला लागलेला शाप आहे. येथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाला समोरा जात आहे. जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली, परंतू दुष्काळ कमी झाला नाही. किती वर्ष आभाळाकडे येरे येरे पावसा म्हणून वाट पाहवी लागणार आहे. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळमुक्त मराठवाडा करण्यासाठी 64 हजार किलो मिटरचा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविणार असून संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. 20 हजार कोटी त्यावर खर्च केले जाणार आहेत. पाण्याचा दुष्काळ कधीच परवडणार नाही, त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 300 टीएमसी पाणी उचलून मराठवाड्याला 167 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी नदी जोड प्रकल्प राबविण्यासाठी 25 टीएमसी पाणी आणण्याचा डीपीआर तयार करून त्यास मान्यता दिली जाईल तसेच कृष्णा खोऱ्यातील पाणी बोगद्याच्या सहायने बीड जिल्ह्यात आणण्याचे काम सुरू झाले आहे. मध्य वैतरणाचे पाणी लिप्ट करून संपूर्ण मराठवाडा दुष्कामुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शहर विकासासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शहराच्या रस्ते विकासासाठी 100 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 75 टक्के निधी खर्च झाल्याचे दाखवा आणखी 200 कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नवीन 1600 कोटींची योजना राज्य सरकार मंजूर करेल, अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
याप्रंगसी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, यात्रा संयोजक आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार प्रशांत बंब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवक्ते गणेश हाके, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार श्रीकांत जोशी, उद्योजक विवेक देशपांडे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. माधुरी अदवंत, उपमहापौर विजय औताडे, श्रेयस प्रतिष्ठणचे अध्यक्ष बसवराज मंगरूळे, अनिल मकरिये आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
विधानसभेत विरोधी पक्ष नेता दिसणार नाही
काँग्रस-राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंधरा वर्ष सत्तेत असताना जनतेशी संवाद करावा असे वाटले नाही. त्यावेळी त्यांची मुजोरी आणि मस्ती होती, आता त्यांना जनता आठवत आहे, परंतू ते जनतेच्या मनातून उतरले आहेत, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून सिध्द झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेता मिळू दिला नाही. ही स्थिती महाराष्ट्रात येणार आहे. विधानसभेत विरोध पक्ष नेताच दिसणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.




























































