हे ‘1962’चे लष्कर नाही, जनरल नरावने यांचा चीनला कडक शब्दात इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचा आकांडतांडव सुरू आहे, तर दुसरीकडे चीनने देखील इतिहासाचा दाखला देत हिंदुस्थानला भीती दाखवण्याचा बिनडोक प्रयत्न केला. यानंतर ईस्टर्न आर्मी कमांडचे चीफ लेफ्टनंट जनरल एमएम नरावने यांनी चीनला कडक शब्दात इशारा दिला. ‘हे 1962 चे लष्कर नाही’, असे म्हणत जनरल नरावने यांनी चिनी ड्रॅगनला सुनावले आहे.

जनरल नरावने म्हणाले की, हिंदुस्थानी लष्कर आता 1962 सारखे नाही. चीन जर आम्हाला ‘इतिहास विसरू नका’ म्हणत असेल तर आम्हीही त्यांनी तेच सांगू. 1962 ला लष्कराने चीनविरोधात सर्वच विभागात चांगली लढाई केली होती. तो आमचा पराभव नव्हता तर ‘राजकीय पराजय’ होता, असेही ते म्हणाले. 1962 नंतर लष्कराने बराच मोठा प्रवास केला आहे, असेही ते म्हणाले.

डोकलामवर वक्तव्य
डोकलाम वादावर बोलताना जनरल नरावने म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर विकास झाला आहे. त्यांनी दोन चौक्या बनवल्या आहे, तर आम्हीही दोन चौक्या बनवल्या आहेत. तसेच त्यांनी रस्त्यांचे जाळे विणले आहे, तर आम्हीही एलओसीपर्यंत रस्त्यांची निर्मिती केली आहे. डोकलाम वादावेळी आम्ही चीनला जशास तसे उत्तर दिले होते. चीनने कोणतीही तयारी न करत हिंदुस्थानला धमकावून घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्यांच्यासमोर शड्डू ठोकून उभे राहिलो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आम्ही खंबीर आहोत, असेही ते म्हणाले. तसेच एलओसीवरील घुसखोरीबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांनी 100 वेळा एलओसीवर घुसखोरी केली तर आम्हीही 200 वेळा केली आहे.