
आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 1.76 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याचा निर्णय हा रिझर्व बँकेने नेमलेल्या तज्ञ समितीने घेतला आहे. याबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. तसेच या पैशाचा उपयोग कसा करणार याबद्दल मी काहीही सांगू शकणार नाही. सरकारच त्यावर निर्णय घेईल, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पुणे विभागातील उद्योजक आणि व्यावसायिक प्रतिनिधींसमवेत जीएसटी आणि आयकरसंदर्भात संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. रिझर्व बँकेने 1.76 लाख कोटी रुपयांची सरप्लस रक्कम केंद्र सरकारला दिली ती कशासाठी दिली आणि त्याचा उपयोग कसा करणार? याबद्दल विचारले असता सीतारामन म्हणाल्या, विमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीच्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. त्यानंतर हे पैसे देण्यात आले. या पैशाचा उपयोग कशासाठी करणार त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. केंद्र सरकार त्यावर निर्णय करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात मंदीचे सावट आहे. अशा वेळी पुणे आणि परिसरातील ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्राला मदतीसाठी काही निर्णयाची प्रतीक्षा आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता अर्थ मंत्र्यांनी मी मागील आठवडय़ातच काही निर्णय घोषित केले आहेत. त्याचे नेमके परिणाम पुढे आल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असे सांगितल़े उद्योग आणि व्यावसायिकांची आणि जीएसटीबद्दल असे काही मुद्दे आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी आजची पुण्यातील ही चौथी बैठक होती. जीएसटी किंवा टॅक्स करण्याचा निर्णय समिती ठरवत असते. आजच्या बैठकीत यासंदर्भात उद्योग आणि व्यापार क्षेत्रासाठी काही गोष्टी करता येतील का? याबद्दलची माहिती घेतली गेली, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चोर-चोर म्हणायची सवय जडली आहे. दुसऱयांना चोर म्हणण्यात राहुल गांधी माहीर आहेत. जनतेनेच त्यांना धडा शिकवला आहे, असे जोरदार प्रत्युत्तर अर्थ मंत्री सीतारामन यांनी दिले. रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळालेला निधी हा चोरी असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. याचा जोरदार समाचार सीतारामन यांनी घेतला. काँग्रेसमध्ये अनेक माजी अर्थ मंत्री आहेत. त्यांच्याशी राहुल गांधींनी चर्चा करावी आणि मग केंद्र सरकारवर आरोप करावेत. चोर-चोर म्हणून राहुल गांधी जेव्हा जोराने बोलतात तेव्हा देशातील जनता त्यांना उत्तर देते. गेल्या निवडणुकीत ते दिले आहे, असे सीतारामन यांनी फटकारले.

























































