
पंजाब नॅशनल बँकेला कोटय़वधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती करणारा अर्ज सीबीआयने आज मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केला.
विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्यासमोर दाखल केलेल्या या अर्जात सीबीआयने नीरव मोदी, त्याचा भाऊ मिशल आणि नीरव मोदीच्या मालकीच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुहास परब याचे नावही नमूद केले असून या तिघांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हे तिघे आरोपी देश सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्धचे वॉरंट एक्झिक्यूट झालेले नाहीत. यापैकी नीरव मोदी याला लंडन येथे अटक झाली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र मिशल आणि परब यांचा अद्यापि ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या तिघांविरुद्ध प्रोब्लेमेशन आणि मालमत्ता जप्तीचे आदेश जारी करण्यात यावेत अशी सीबीआयने मागणी केली आहे.


























































