
जयसिंगपूर बसस्थानक, रेल्वे स्टेशन व आठवडी बाजारांत महागड्या मोबाईलची चोरी करून ते विकणार्या दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचे 20 मोबाईल संच जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपाधिक्षक किशोर काळे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील तातोबा रेणके (30) व किरण चंद्रकांत मुकोटे (27 ) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणांहून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने पोलीस मुख्यालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंगपूर बसस्थानकासह अन्य ठिकाणी साध्या वेशातील पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, खबर्यांना तैनात केले होते. बसस्थानकावरील चौकशीनुसार 27 ऑगस्ट रोजी सुनील रेणके याला पोलिसांनी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे मोबाईल चोरत असल्याची कबुली दिली. हे मोबाईल विकण्यासाठी त्याचा साथीदार किरण मुकोटे हा त्याला मदत करत असल्याचेही त्याने सांगितले. चौकशी केली असता त्याच्याकडेही काही चोरलेले मोबाईल आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.
या दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरीला गेलेल्या मोबाईलमधील सिमकार्डचा वापर गंभीर गुन्ह्यात झाल्यास त्याचा नाहक त्रास लोकांना होऊ शकतो. म्हणून मोबाईल चोरीची नोंद पोलिसांत करावी, असे आवाहन पोलिस उपाधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे. सापडलेल्या मोबाईलमधील आयएमए क्रमांकांवरून मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत दिले जातील, असे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी सांगितले.

































































