
सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप थोड्याच वेळात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानिमित्ताने सोलापुरात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार धनंजय महाडीक, आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याच पार्श्वभूमिवर प्रसारमाध्यमांशी बोलताना महाडिक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण सांगितले आहे.
लोकसभेवर निवडून गेल्यावर पाच वर्ष मी मतदारसंघात काम केले. या दरम्यान संसदरत्न खासदार म्हणून माझा गौरवही झाला. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनी प्रयत्न करूनही स्वकियांकडूनच साथ मिळाली नाही. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असे महाडिक म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कामावर देश खूश आहे. आम्हीही यामुळे प्रभावित झालो आहोत. मतदारसंघाचा विकास, कामे करून घेण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी सोडत असलो…
पुढे बोलताना महाडिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असलो तरी शरद पवार, सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. माझा कोणाशीही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



























































