भाजपत येणारे काही साधू-संत नाहीत! आमदार खडसे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

भाजपमध्ये येणारे लोक काही साधू संत नाहीत. या नेत्यांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्यापूर्वी त्यांना वॉशिंग पावडरने धुवून क्लीन केले जाते, मग पक्षात घेतले जाते, अशा खोचक शब्दांत आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, सत्तेत जो कोणी असतो, त्यांच्याकडे येण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. कोणीही विचार, तत्व पाहून पक्षात प्रवेश करत नाही तर भाजपात प्रवेश करण्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. त्यांना सत्तेचे संरक्षण हवे असते त्यामुळे सध्या हे नेते मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे.
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, नारायण राणे यांना भाजपात घेण्याचा निर्णय भाजपला करायचा आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही असेही खडसे म्हणाले.

पवारांच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्तीच

तसेच अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. यावर 1978 साली शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना वेगळा पक्ष स्थापन केला. अनेकांना पक्षात घेतले. यशवंतराव चव्हाण यांना सोडून शरद पवारांनी वेगळी चूल मांडली होती. या काळात जे घडत आहे तेच आज घडत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हे नवीन नाही. शरद पवारांच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे असे मतही आमदार एकनाथ खडसेंनी व्यक्त केले.