आधी वंदू तुज मोरया! विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी प्रत्येक उंबरठा आतुर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छाया- सचिन वैद्य

गणांचा अधिष्ठाता गणपती सोमवारी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या मुहूर्तावर भक्तांच्या घरी विराजमान होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आसमंतात घुमून भक्तिरसाचा गुलाल उधळला जाणार आहे. डोक्यावर मूर्ती घेतलेल्या गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा आनंद, कपाळावर मोरयाची भगवी पट्टी आणि बालहातांनी धरलेले टाळ,  ढोलताशांची जुगलबंदी, त्यावर थिरकणारी पावले आणि आबालवृद्धांचा उत्साह, असे दृश्य गल्लोगल्ली, गावोगावी, शहरांत, अवघ्या राज्यभरात दिसणार आहे. बाप्पाच्या आगमनाने सारे मंगलमय होणार आहे.

बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी…
सोमवार, 2 सप्टेंबर भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला पहाटे 3.55 मिनिटांपासून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करता येईल. दुपारी दीड वाजेपर्यंत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करावी. हा दिवस गणेश स्थापनेचा असल्याने त्यानंतरही ती करता येईल. राहू काल, भद्रा, विष्टीकरण हे पाहण्याची गरज नाही. भक्तांनी कुठलीही शंका मनात न आणता गणेशपूजा करावी.
– ल. कृ. पारेकर गुरुजी, डोंबिवली

जलधारा बरसणार
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. सोमवारी बाप्पाचे आगमन होत असतानाही वरुणराजा अशीच बरसात करणार आहे. हवामान खात्याने तसे भाकीत केले आहे. बाप्पावर जलाभिषेकाची शक्यता लक्षात घेऊन भक्तगण तयारीनिशी गणरायाच्या स्वागताला निघतील.

चाकरमानी ट्रॅफिक जाममध्ये
गणेशोत्सवासाठी गावी निघालेले चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरील ट्रॅफिक जाममध्ये फसले आहेत. तब्बल पाच तास गाडी हटत नसल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. तरीही बाप्पाच्या स्वागताची ओढ मात्र कायम आहे.