
नव्याने लागू झालेल्या वाहतूक नियमांमुळे वाहनचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे या नियमांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दिल्लीत राहणाऱ्या आणि गुरुग्राम न्यायालयात काम करणाऱ्या दिनेश मदान यांना नव्या वाहतूक नियमानुसार 23 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, त्यांच्या स्कूटीची किंमत 15 हजार रुपये आहे. त्यामुळे 15 हजाराच्या गाडीसाठी 23 हजाराचा दंड ठोठावण्यात आल्याने या विरोधात त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
दिल्लीतील गीता कॉलनीत राहणारे दिनेश घराजवळील छोट्यामोठ्या कामांसाठी स्कूटीने निघाले होते. त्यांच्याकडे 2015 सालच्या मॉडेलची स्कूटी आहे. त्याची किंमत 15 हजार रुपये आहे. ते बाहेर पडताच त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. घराजवळच जायचे असल्याने त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडे लायसन्स, गाडीचे रजिस्ट्रेशन, एअर पॉल्यूशन एनओसी आणि थर्ड पार्टी इंश्यूरन्सबाबत विचारणा केली. मात्र, त्यावेळी दिनेश यांच्याकडे यापैकी कोणतीही कागदपत्रे नव्हती. ही सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत, आपण ती मागवतो, असे दिनेश यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले. मात्र, तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी त्यांचे चलान बनवत 23 हजाराचा दंड ठोठावला. हेल्मेटशिवाय गाडी चालवत असल्याने 1 हजार, ड्रायव्हिंग लायसेन्स नसल्याने 5 हजार, इंश्यूरन्स नसल्याचे 2 हजार, रजिस्ट्रेशन नसल्याचे 5 हजार आणि एअर पॉल्यूशन एनओसी नसल्याचे 10 हजार असा एकून 23 हजार रुपयांचा दंड दिनेश यांना ठोठावण्यात आला आहे.
Dinesh Madan: Value of my scooty is around 15,000.I even got a copy of RC on WhatsApp from home but by then he had printed.The amount could have been less if he had waited for a while. I want that fine should be relaxed. From now on I will always carry my documents. https://t.co/dJo5BeIcGD
— ANI (@ANI) September 3, 2019
दंडाची रक्कम दिनेश यांच्याकडे नसल्याने त्यांची गाडी जप्त करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. 15 हजाराची स्कूटी सोडवण्यासाठी 23 हजाराचा दंड भरायचा की स्कूटी विसरून नवी गाडी घ्यायची असा प्रश्न दिनेश यांच्यापुढे उभा आहे. दिनेश यांच्याप्रमाणे अनेकांनी या वाहतूक नियमांविरोधात रोष व्यक्त केला आहे.

























































