
मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. सातही तलावांत मिळून काल सकाळी 6 वाजेपर्यंत 1415020 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. हा पाणीसाठा 98 टक्के असून पुढील 357 दिवस म्हणजेच 23 सप्टेंबर 2020 पर्यंत पुरेल. दरम्यान, गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर या वर्षी तलावांत झालेला पाऊस मुंबईकरांसाठी वरदान ठरणार आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यानुसार मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. यामध्ये सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर 2018 रोजी तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी होता.
उपलब्ध पाणीसाठय़ातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी पालिकेने नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरू केली होती. मात्र जुलैमध्ये तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्यामुळे 20 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात बंद करण्यात आली आहे.
तलावांतील पाणीसाठा
- अप्पर वैतरणा 2,17,404 दशलक्ष लिटर
- मोडक सागर 1,28,925 दशलक्ष लिटर
- तानसा 1,44,593 दशलक्ष लिटर
- मध्य वैतरणा 1,90,797 दशलक्ष लिटर
- भातसा 6,97,558 दशलक्ष लिटर
- विहार 27,698 दशलक्ष लिटर
- तुळशी 8,046 दशलक्ष लिटर



























































