
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांबरोबर इंडिगोच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाडय़ा बुधवारी रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यात गुरुवारीदेखील ‘तुतारी एक्प्रेस’सह कोकणात जाणाऱ्या काही गाडय़ा रद्द करण्यात आल्याने संतप्त प्रवाशांनी दादर रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन केले. प्रवाशांच्या आंदोलनाने खडबडून जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि मागणीमुळे तुतारी एक्प्रेस ही गाडी उशिराने चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘तुतारी एक्स्प्रेस’ बुधवारी रद्द करण्यात आली होती. दादर–रत्नागिरी पॅसेंजरही उशिराने धावत असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दादर रेल्वे स्थानकात एकच गर्दी उसळली. त्यातच गुरुवारीदेखील तुतारी एक्प्रेस रद्द करण्यात आल्याच्या घोषणेमुळे रेल्वे स्थानकात ताटकळत उभ्या असलेल्या 20 ते 25 प्रवाशांनी थेट रुळावर ठाण मांडले.
विमानसेवेला ब्रेक
मुंबईत विमानतळाकरील धावपट्टीकर साचलेले पाणी, दाट धुके आणि अंधारामुळे विमानसेवेला ब्रेक लागला. इंडिगोच्या विमानाने मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रकाशांची रखडपट्टी झाली असून त्यांना सात तास विमानातच काढावे लागले. याबद्दल प्रवाशांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. पाऊस आणि खराब हवामानामुळे 76 टक्के विमान उड्डाणे प्रभावित झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.























































