
शनिवारी सहाव्या दिवशा बाप्पांना आणि गौरींना निरोप देण्यासाठी मुंबईतील चौपाटय़ांवर गर्दी उसळेल. पण गणेशभक्तांनो, जरा इकडे लक्ष द्या… उत्साहाला जरा आवर घाला. कारण उद्या गौरी-गणपती विसर्जनावर मुसळधार पावसाचे आणि महाकाय लाटांचे संकट असणार आहे. पुढचे दोन दिवस मुंबईसह उपनगरांत, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच सायंकाळी समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे दुपारपर्यंतच विसर्जन उरकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात मुंबईपासून ते ओडिशापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा गडद झाल्यामुळे मुंबईत उद्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज शुक्रवारी पावसाची दिवसभर नुसतीच भुरभुर होती. अधूनमधून एखादी जोरदार सर येऊन जात होती.
काय कराल…
बाप्पाला निरोप देताना शिस्तीत बाप्पांची मूर्ती जीवरक्षकांकडे सोपवा.
विशेषतः लहान मुलांची आणि महिलांची काळजी घ्या.
बाप्पांची मूर्ती जीवरक्षकांकडे सोपवल्यानंतर तत्काळ बाहेर पडा.
पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करा.
अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठलीही मदत लागल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
हे टाळा-
समुद्रात आतमध्ये जाणे टाळा.
समुद्राच्या किनाऱ्यावर उगाचच गर्दी करू नका.
हुल्लडबाजी करू नका.
आपला ग्रुप सोडून इतरत्र जाऊ नका.
बाप्पांची मूर्ती घेऊन येणाऱया वाहनांच्या जवळपास गर्दी करू नका.
नंदूरबारमध्ये सहा बुडाले
शहादाजवळील वडछील येथे पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे.
























































