
राजेंद्र लोढा समितीच्या सर्व शिफारसी स्वीकारण्यासाठी केलेली टाळाटाळ… नव्या घटना दुरुस्तीला विलंब… निवडणूक ऑफिसर नियुक्तीचा थांगपत्ता नाही… याच पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) पाय आणखी खोलात जाणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी संलग्न सर्व संघटनांना अल्टिमेटम दिला आहे.
बीसीसीआयची निवडणूक 22 ऑक्टोबरला होणार असून त्याआधी 28 सप्टेंबरपर्यंत सर्व संघटनांना नव्या घटनेसह निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेली दोन वर्षे रेंगाळलेली निवडणूक पुढच्या 22 दिवसांत होणे सध्या तरी शक्य दिसत नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या निवडणुकीतील मतदानाचा अधिकार आणि बोर्डाकडून मिळणारा निधी एमसीएला गमवावा लागणार हे जवळपास निश्चित आहे.
… तर निरीक्षकाची निवड होणार
एमसीएकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून कठोर पाऊल उचलण्यात येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. एमसीएने निवडणूक घेण्यासाठी टाळाटाळ केल्यास बीसीसीआयकडून निरीक्षकाची निवड करण्यात येईल, असे सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले.
प्रशासकीय समितीकडून देण्यात आलेले निर्देश
22 ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक.
संलग्न संघटनांची निवडणूक घेण्याची अंतिम तारीख 14ऐवजी 28 सप्टेंबर.
सर्व संघटनांनी नव्या घटनेची नोंद, निवडणूक ऑफिसरची निवड 12 सप्टेंबरपर्यंत करावी.



























































