पॉलीहाऊस-शेडनेटधारक शेतकर्‍यांचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉलिहाऊस शेडनेटधारक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यव्यापी आंदोलन होत आहे. राज्यभरातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने व धरणे आंदोलन करून शेतकरी आपल्या मागण्यांकडे सरकारचे पुन्हा एकदा लक्ष वेधणार असल्याची माहिती डॉ.अजित नवले यांनी दिली आहे. पॉलिहाऊस शेडनेट धारक संकटग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पॉलिहाऊस शेडनेटमध्ये उत्पादित होणार्‍या मालाला हमीभावाचे संरक्षण, पीक विमा योजनेत नाशवंत शेतीमालाचा समावेश व शासकीय योजनांमध्ये सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना विनाविलंब अनुदान सहाय्य या प्रमुख मागण्यांसाठी या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

किसान सभेचे राज्य सरचिटणीस  डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले, नगर येथे संपन्न झालेल्या पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकरी समन्वय समितीच्या  राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळ, नापिकी, तापमानातील चढउतार, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा अल्प भाव यासारख्या कारणांमुळे गेल्या पाच-सहा वर्षात राज्यातील पॉलीहाऊस-शेडनेटची शेती तोट्यात गेली आहे. पॉलीहाऊस-शेडनेट शेती योजनांच्या अंमलबजावणीतल्या चुकीच्या धोरणांचा या शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नोकरीच्या मागे न लागता आधुनिकतेची कास धरत अनेक उच्चशिक्षित तरुण पॉलीहाऊस-शेडनेट शेतीकडे वळाले. मात्र वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या तोट्याच्या शेतीतून डोक्यावरील बँक कर्जाचा डोंगर वाढला असून परिणामी त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. शासकीय धोरणे आणि नौसर्गिक आपत्तीमुळे या शेतीतून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने बँक कर्जाचा हप्ता फेडणे या शेतकर्‍यांना  अशक्य झाले आहे. शिवाय जाचक अटींमुळे अनेक शेतकर्‍यांना शासनाकडून मिळणार्‍या अनुदानापासून वंचित व्हावे लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  शेतकर्‍यांची संपूर्ण शेती विक्री केल्यावरही त्यांच्यावरील  कर्ज फिटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर कर्जमाफी देऊन या शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात अशी  मागणी समन्वय समितीने केली आहे.

समन्वय समिती गेली तीन वर्षे यासाठी शासनपातळीवर लढा देत आहे. समितीने राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.  राज्यमंत्र्यांनी अडचणीत सापडलेल्या पॉलीहाऊस-शेडनेटधारक शेतकर्‍यांबद्दल  सहानुभूती व्यक्त केली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. किसान सभेच्या लाँगमार्च आंदोलनातही या शेतकर्‍यांचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण केली गेल्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय पॉलीहाऊस-शेडनेटधारक शेतकर्‍यांनी घेतला आहे.