
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 1 ऑक्टोबरपासून बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल केले आहेत. यानुसार खात्यात पैसे जमा करणे, पैसे काढणे, चेकचा वापर आणि एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे. एसबीआयने जारी केलेल्या एका पत्रकानुसार 1 ऑक्टोबरपासून महिन्यातून केवळ तीन वेळाच खात्यात निःशुल्क पैसे जमा करता येतील. त्यानंतर खात्यात 100 रुपये जरी जमा केल्यास 50 रुपये (जीएसटी वगळून) भरावे लागतील. त्यानंतर पाचव्यांदा पैसे भरल्यास 56 रुपये आकारण्यात येतील.
चेक बाऊन्स झाल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. चेक बाऊन्स झाल्यास जीएसटीसह 168 रुपये भरावे लागणार आहेत. एकीकडे एटीएमद्वारे होणाऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये वाढ होत असताना बँकेत जाऊन एनईएफटी आणि आरटीजीएस करणे आता महागले आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या बँक खात्यात 25 हजारांवर रक्कम जमा आहे असे ग्राहक एटीएमचा वापर निःशुल्क करू शकतात. तसेच 25 हजारांपेक्षा कमी रक्कम जमा असलेले ग्राहक महिन्याला आठ ट्रान्झॅक्शन निःशुल्क करू शकतात. तसेच सॅलरी खाते असणाऱ्या ग्राहकांनी देशातील कोणतीही बँक आणि एसबीआयच्या एटीएमचा वापर केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
असे असेल शुल्क
- आरटीजीएस ( बँकेच्या शाखेद्वारे)
- दोन ते पाच लाख रुपये – 20 रुपये (जीएसटी वगळून)
- पाच लाखांपेक्षा अधिक – 40 रुपये (जीएसटी वगळून)
एनईएफटी (जीएसटी वगळून)
- 10 हजार – 2 रुपये
- 10 हजार ते एक लाख – 4 रुपये
- 1 ते 2 लाख – 12 रुपये
- दोन लाखांपेक्षा अधिक – 20 रुपये
























































