
वंचित बहुजनबरोबर आघाडी न करता स्वबळावर लढण्याची घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. मात्र आमची एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर आघाडी कायम आहे, असे जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या भवितव्याबद्दल संभ्रम निर्माण केला आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांनी शुक्रवारी संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांची साथ सोडल्याची घोषणा केली होती. आंबेडकरांनी आम्हाला विधानसभेच्या 288 जागांपैकी फक्त आठ जागा देऊ केल्या आहेत. इतक्या जागा आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे ते म्हणाले होते. आंबेडकर यांनी यावर पाळलेले मौन आज अखेर सोडले. आपली युती ओवेसी यांच्या एमआयएमशी आहे, त्यांच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांशी नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य होईपर्यंत युती कायम आहे असे आपण मानतो, असे ते म्हणाले. ओवेसींची माणसे आपल्याला भेटून गेली आहेत. ते आपली भूमिका हैदराबादमध्ये ओवेसींपुढे मांडतील. त्यामुळे त्यांचा निरोप आपल्याला अपेक्षित आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
























































