
प्रवाशांना बसल्या जागी आपल्या मोबाईलवर बस कुठपर्यंत आली याची सद्यस्थिती कळविणार्या बेस्टच्या बस ट्रकिंग मोबाईल ऍप आणि इलेक्ट्रिक बसचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी कुलाबा आगारात उद्घाटन होणार आहे.
‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस प्रकल्प) अंतर्गत बेस्टच्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून बेस्टच्या बस ट्रकिंग ऍपचे सोमवारी लोकार्पण करण्यात येत आहे. त्यानंतर प्रवाशांना ऍप डाऊनलोड करता येईल. या मोबाईल ऍपमुळे प्रवाशांना बसची सद्यस्थिती समजणे सोपे ठरणार आहे. यात बसमार्ग, बसची वेळ, बस थांब्यांविषयी माहिती आदी सर्व गोष्टी ऍपमुळे कळणार आहेत. तसेच 200 बस थांब्यांवर प्रवाशांना बसची नेमकी वेळ समजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलकदेखील बसविण्यात येणार आहेत. या मोबाईल ऍपबरोबरच अलीकडेच बेस्टने घेतलेल्या प्रदूषणमुक्त 10 इलेक्ट्रिक बसेसचेही या वेळी लोकार्पण करण्यात येणार आहे.
























































