
दहशतवाद्यांनी दक्षिण हिंदुस्थान टार्गेट केले आहे. येथे हल्ला होऊ शकतो असे इनपूट लष्कराला मिळाले आहेत. त्यासाठी दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे अशी माहिती लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी दिली. दरम्यान, गुजरातजवळ समुद्र सीमेवर सरक्रीक क्षेत्रात संशयित बेवारस बोट सापडल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील आर्मी लॉ कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमानंतर लेफ्टनंट जनरल सैनी पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तानी लष्कराने गुजरातजवळच्या सरक्रीक परिसरात कमांडो तैनात केले आहेत. समुद्रमार्गे घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा कट आहे. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता सैनी म्हणाले, सरक्रीक येथे संशयित बोट आढळली असून याबाबत लष्कराकडून सखोल तपास सुरू आहे. सरक्रीक परिसरात लष्कराच्या गस्तीमध्ये वाढ केली आहे. दहशतवाद्यांकडून दक्षिण हिंदुस्थानात हल्ला होऊ शकतो अशी माहिती लष्कराकडे आहे. लष्कराकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला जाईल, असेही सैनी यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्य आणि राज्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या धमक्यांबाबत विचारले असता लेफ्टनंट जनरल सैनी म्हणाले, अशा धमक्यांचा लष्करावर काहीही परिणाम होत नाही. लष्कर मूंहतोड जबाब देण्यास, लढण्यास सज्ज आहे.
‘इस्रो’ सेंटर, तिरुपती बालाजी येथे सुरक्षा वाढविली
आंध्र प्रदेशात दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेऊन तिरुपती बालाजी मंदिर आणि श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे सुरक्षाव्यवस्था आणखी कडक केली आहे.
किनारपट्टीवर हायऍलर्ट
सदर्न कमांड म्हणजे केवळ तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक नाही तर गुजरातचा काही भागही यात येतो, असे लष्कराच्या प्रवक्त्याने चेन्नईत सांगितले.
आंध्र प्रदेशच्या 974 कि. मी. समुद्री किनारपट्टीवर हायऍलर्ट जारी केला आहे. बंदोबस्तात वाढ केली असून एक कंट्रोल रूम सुरू केल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रविशंकर अय्यनार यांनी सांगितले.
केरळमध्ये विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानक येथे बंदोबस्त वाढविला आहे. केरळमध्ये ओनम सण उत्साहात साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































