जीवावरचा धोका टाळण्यासाठी त्याने मुलीला सातव्या मजल्यावरून फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
black-magic

‘तुझ्या जिवाला धोका आहे.  तू जर जुळ्या बालकांना ठार मारलास आणि तुरुंगात गेलास तरच तुझ्या जीवावरचा धोका टळेल’ असा संदेश मला देवांकडून सतत यायचा. काळ्या जादूतून मुक्त व्हायचे होते. त्यामुळे देवांचा आदेश मान्य करून मी तीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला, पण तिची बहीण बचावली. कुलाबा येथे इमारतीच्या सातव्या मजल्यावरून फेकून चिमुकलीचा नाहक बळी घेणार्‍या आरोपीचे असे म्हणणे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शनिवारी दुपारी कुलाबा येथील ‘अशोका–अ’ या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. वास्तवात मुलगी पडली नसून तिला अनिल चुगानी (43) याने त्याच्या घराच्या बेडरूममधून खाली फेकल्याचे समोर आले. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी आरोपी अनिल चुगानीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हे कृत्य करण्यामागचे गुपित उघड केले. खरे तर मृत मुलीसह तिच्या बहिणीलादेखील ठार मारायचे होते, पण तसे करणे जमले नाही. दुसर्‍या मुलीला मरण्याआधी पकडलो गेलो. या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो पण मिळालेली संधी साधता आली नाही, असे चुगानी पोलिसांना सांगत आहे.

सहा महिन्यांपासून संधीच्या शोधात

सहा महिन्यांपूर्वी चुगानी मोरक्कोवरून मुंबईत आला. जुळ्या बालकांना मारायये हेच त्याच्या डोक्यात होते. तसे त्याने अनेक डायर्‍यांमध्ये वारंवार लिहूनदेखील ठेवले होते. अखेर चुगानीने शनिवारी संधी साधली अणि एका निरागस बालिकेला ठार मारले.

मित्राच्या मुलींना टार्गेट

जुळ्या बालकांना ठार मारून आपल्यावर झालेल्या काळ्या जादूतून मुक्त व्हायचे अशी खुणगाठ चुगानीने बांधली होती. तो सहा महिन्यांपासून जुळ्या बालकांच्या शोधात होता. चुगानी राहतो त्याच इमारतीला लागून असलेल्या इमारतीत बळीत मुलगी तिची जुळी बहीण, मोठा भाऊ आणि आईवडिलांसोबत राहत होती. मुलीचे वडील आणि चुगानी लहानपणापासूनचे मित्र आहेत. मित्राला जुळ्या मुली असल्याचे कळताच चुगानीने त्यांना ठार मारायचे पक्के केले. आणि एका मुलीचा बळी देखील घेतला.

तिने काळी जादू केली म्हणून…

चुगानी मोरक्को देशात राहतो. तेथेच त्याचे आईवडील असून तो काम पण तेथेच करतो. कामाच्या ठिकाणी असलेल्या एका सहकारी महिलेने माझ्यावर काळी जादू केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान देवांकडून मला संदेश यायचे की तू जुळ्या बालकांना ठार मार मग तुरुंगात जा तरच तुझ्या जीवावरचा धोका टळेल, म्हणून तीन वर्षांच्या मुलीला मारल्याचे चुगानी सांगतो.