
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तानने आता हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जैश–ए–मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरला तुरुंगातून गुपचूप बाहेर काढले आहे. यावेळी हिंदुस्थानमधील कश्मीरबरोबरच राजस्थानही ‘जैश’च्या टार्गेटवर आहे. अजहरसह आणखी एका दहशतवाद्याला पाकिस्तानने सोडले आहे.
कश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर कश्मीरवर हक्क सांगण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीचा धंदा सुरू केला आहे. घुसखोरीवरही हिंदुस्थानने नियंत्रण ठेवल्यामुळे आता दहशतवादी संघटनांना सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मसूद अजहरला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आहे.
सीमेजवळची राज्ये निशाण्यावर
हिंदुस्थानच्या सीमेजवळची राज्ये आणि शहरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. जम्मू–कश्मीरसह राजस्थानला दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली. हे हल्ले यशस्वी व्हावेत यासाठी पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवाद्यांना संरक्षणकवच मिळावे यासाठी पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत.






















































