
जगातील सर्वात दुर्मिळ व जगातील सर्वात लहान मांजर मुंबईत आरेमध्ये आहे अशी माहिती वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी दिली. ही मांजर रस्टी स्पॉटेड कॅट किंवा रानमांजर म्हणूनही ओळखली जाते, असेही खानोलकर यांनी नमूद केले.
आरे कारशेडच्या जागेपासून 500 मीटर अंतरावर या जगातल्या दुर्मिळ मांजराचे वास्तव्य असल्याचा व्हिडीओ आम्हाला मे 2019 मध्ये मिळाला आहे. ही मांजर शेड्युल एकमध्ये व अतिशय दुर्मिळ आहे. वाघटी तसेच सिव्हेट कॅटही आरेमध्ये आढळून येते. आरेमधील जैवविविधत आम्ही कॅमेर्यात कैद केल्याचे ते म्हणाले.
संजय गांधी उद्यान व आरे कॉलनी
संजय गांधी उद्यान व आरे कॉलनी सलग आहे. तिथे वन्य जीवांचे येणे जाणे सुरु असते. आपल्यासाठी आरे वेगळे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वेगळे असले तरी वन्य जिवांसाठी त्या सीमा नाहीत. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीव आरेमध्ये येत–जात असतात. नॅशनल पार्क हा बफर झोनसारखा आहे.
आरे म्हणजे पर्यावरण संस्था
वन्य अभ्यासक राजेश सानप हे 2006 पासून आरे जंगलाचा अभ्यास करीत आहेत. विंचू, पालींच्या व कोळ्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास केला आहे. त्यांचे नामकरणही केले आहे. आरे कॉलनी हा विषय केवळ झाडे, बिबळे, रानमांजर एवढय़ापुरता मर्यादित नाही. संपूर्ण पर्यावरण संस्था आरेमध्ये वाढत आहे.
कोळ्यांच्या सहा प्रजाती आरेमध्ये
आरेचा संबंध जैवविविधतेशीही आहे. या जैविक साखळीत छोटे जीवही तेवढेच महत्त्वाचे आहेत. विंचू, कोळी यांचा अभ्याससुरू आहे. आरेमध्ये कोळ्यांच्या विविध प्रजाती सापडतात. आरेमधील कोळ्यांचा 110 वर्षांनी पुन्हा आम्ही नामकरण केलेआहे. आरेमध्ये सापडला म्हणून ‘आरेन्सीस’ असे त्याचे आम्ही नामकरणही केले आहे. देशात कोळ्यांच्या 110 पेक्षा अधिकप्रजाती आहेत. आरेमध्ये कोळ्यांचा सहा प्रजाती आहेत. दुर्मिळ पालींचेही वास्तव्य आरेच्या जंगलात आहेत याकडे राजेश सानप यांनी लक्ष वेधले.
फुलपाखरे व मधमाश्या
आरेमध्ये असंख्य प्रकारच्या मधमाश्या व फुलपाखरे व पक्षी आहेत. आरेमध्ये 120 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. त्यात स्थलांतरित पक्षी, स्थानिक पक्षी यांचा समावेश आहे. आरेमध्ये अतिशय दुर्मिळ फुलपाखरे सापडतात. देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर जसा आरेमध्ये सापडतो तसाच ‘राज्याचे फुलपाखरू’ म्हणून दर्जा मिळालेले फुलपाखरूही आरेमध्ये सापडते. अजगरही या जंगलात आहेत. या जंगलात अजून असंख्य प्रजाती आहेत, पण त्यावर संशोधन होणे बाकी आहे. पण त्याआधीच जंगल संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यासाठी अभ्यास करण्याची गरज राजेश सानप यांनी व्यक्त केली.
कारशेडमुळे पर्यावरणाला धोका
आरे कॉलनीबाबत तांत्रिक समितीने 2015 मध्ये सर्व्हे करून एक अहवाल दिला आहे. त्यानंतर 2019 मध्येही एक अहवाल दिला आहे. आरे कॉलनीत जैवविविधता आहे असे या दोन्ही अहवालात नमूद केले आहे. आरेमध्ये क्राँकीटीकरण केले तर पावसाचे पाणी मिठी नदीत वाहून जाईल व त्यातून चकाला व आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूरस्थिती निर्माण होईल. आरे कॉलनी हे बिबट्याचे आश्रयस्थान आहे आणि आरेमध्ये कारशेड केल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो असे ‘नीरी’च्या अहवालातही नमूद केले आहे.
वन्य जीव आहेच
आरेमध्ये वन्य जीव नाही असे सांगितले जात आहे. मग हे काय आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी या सादरणीकरणाच्या वेळेस केला.





























































