रुढीबद्ध चौकटी भेदणारा लेखक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शशिकांत सावंत

हिंदुस्थानातील हाताच्या बोटावर मोजता येणाऱया द्विभाषिक लेखकांमध्ये किरण नगरकर यांचे नाव आवर्जून घेण्यात येते. त्यांच्या सात सक्कं त्रेचाळीस या पहिल्या मराठी कांदबरीने मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिली. साठोत्तरीच्या दशकांतील सामाजिक, सांस्कृतिक घुसळणीचा तिरकस आढावा घेत मुंबईतील निम्नमध्यमवर्गीयांचं आयुष्य त्यांनी अगदी नैसर्गिक शैलीत मांडलं.

किरण नगरकर यांना पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी कुठलातरी पेडर रोडच्या आसपासच्या एका घराचा पत्ता कळवला होता. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता किंवा त्या नंबर कोणाला देत नसत. त्या घराच्या लॅण्डलाइन वर मी फोन करून पत्ता विचारत पोहोचलो. पहिल्या मजल्यावर घर होतं. बंगल्यासारखं प्रशस्त, पण आश्चर्य म्हणजे पहिल्या मजल्यावर हिरवळ होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की, याची रचनाच वेगळी आहे.

नगरकर येत आहेत, असं म्हणत घरातल्यांनी कळवलं आणि मी इकडे तिकडे बघत बसलो. पूर्ण बैठकीची जागा ही देशभरातल्या वेगवेगळ्या सौंदर्यकृतींनी सजवलेली होती. तितक्यात नगरकर आले. ते पांढरा झब्बा, लेंगा अशा नेहमीच्या वेषात होते. सत्तरीत असल्यामुळे केस पूर्ण पांढरेदेखील झालेले. मात्र नेहमीची गुळगुळीत, घोटलेली दाढी आणि चेहऱयावर गंभीर असा भाव.

नगरकरांशी त्यापूर्वी कधीमध्ये बोललो होतो ते सोशल गॅदरिंगमधलं संभाषण होतं. मग कधी एखाद्या कार्यक्रमात किंवा कधी स्टरलिंग थिएटरच्या पायऱयांवर. पण आता मात्र मी मुलाखतीच्या तयारीने गेलो होतो. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ चाळीस वर्षांनंतर पुन्हा प्रकाशित होत होती. त्याबद्दल त्यांची मुलाखत घ्यायची होती. ही 2014 ची गोष्ट आहे.

त्यांनी ‘अभिधानंतर’ या मासिकामध्ये अरुण कोलटकर वर लेख लिहिला होता. त्यात म्हटलं होतं की, अरुण कोलटकर आणि माझी मैत्री कशी, तर मी एकत्र 18 वर्षे काम केलं ते म्हणजे नवरा-बायकोसारखंच. तर मी तिथून सुरुवात केली. त्यात नगरकर म्हणाले की, अरुण खूप स्पेशल होता आणि हे त्याला माहीत होतं? तो आणि मी, एमसीएम या प्रसिद्ध कंपनीत कॉपीरायटर आणि व्हीज्यूलायझर असे एकत्रित काम करत होतो. के.सी.कर्तक आमचा बॉस होतं. त्याचा आग्रह असायचा की, टॉयलेटला जाऊन आलात तरी नवीन कल्पना असली पाहिजे.

पण त्या काळात आम्हाला एखादं काम पूर्ण करून झाल्यावर आणि क्लाइंटने अप्रूव केल्यावर तितक्यात काही नवीन कल्पना सुचली तर आम्ही ते काम परत मागवायचो.

अरुण आणि त्याच्या कवितांवर गप्पा मारता मारता गाडी नगरकरांच्या लेखनावर आली. ते म्हणाले की, कादंबरी लिहिताना मला काहीच माहीत नसते की, मी काय लिहिणार आहे किंवा कसे. पण ‘ककोल्ड’ लिहिताना मला एक माहीत होतं की, त्या कादंबरीत कधीतरी मीराचा नवरा राजा स्वतःला पूर्ण निळ्या रंगाने माखून घेणार आहे.

तिथून मग मी त्यांना मार्कवेझ, मिलिंद कुंदेराय या लेखकांबद्दल विचारलं. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातल्या सगळ्याच लेखकांवर यांचा प्रभाव होता नंतर. ते व मी पुढे मे. पू. रेगे आणि श्री. पु. भागवत यांच्याबद्दल बोलू लागलो. ‘बेडटाईम स्टोरी’ या नाटकावर मे. पू. रेगे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये कौतुक करणारा लेख लिहिला होता त्याची आठवण करून दिली.

नगरकर यांनी या दोघांचं आपल्यावर एक विलक्षण प्रेम असल्याचं सांगितलं. भागवत यांनी किती निगुतीने पुस्तकाची पाठराखण केली, संपादन केलं, हेही त्यांनी सांगितलं. मात्र पुस्तक फारसे खपले नाही. त्याची पहिली आवृत्ती संपायला जवळजवळ तीस वर्षे लागली. ही गोष्ट त्याने अनेक ठिकाणी बोलूनही दाखवलेली आहे आणि तिथेही व्यक्त केली.

आवडलेल्या पुस्तकं आणि चित्रपटांबद्दल बोलताना त्यांनी catcher in the eye आणि midnight cowboy या चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हणाले, चित्रपटातील ड्स्टिन औक्मेनच्या पत्रात पिळवणूक होत असली तरी नात्याला महत्त्व देतात ही गोष्ट विशेष आहे? बोलता बोलता मी घराकडे आणि त्याच्या अंतरंगाकडे बघत होतो. तेव्हा ते म्हणाले की, “हे माझं घर नाही. माझ्या मैत्रिणीचं घर आहे.’’ ते पुढे म्हणाले, असं घर माझ्यासारख्या लेखकाला परवडणारे नाही. नगरकरांचा सगळा प्रवास बघताना असं लक्षात येतं की, कॉपीरायटरकडून लेखकाकडे तो प्रवास झालेला आहे.

त्यांची पहिली प्रसिद्ध कादंबरी आधी कथारूपात आणि नंतर कादंबरी म्हणून प्रकाशित झाली. तिचे नाव होते ‘सातसक्कम त्रेचाळीस’. नंतर 74 साली मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. तेव्हा जयवंत दळवी म्हणजे ठणठणपाळ यांनी त्यांची खूप टवाळी केली. कादंबरीतील पात्रांची नावे कुशंक, आरोटी अशी विचित्र आहेत. त्याबद्दल कोणीतरी त्यांना विचारतो आणि नगरकर सांगतात त्यापेक्षा मोठे नाव ठेवणार होतो, पण नंतर मी ती लहान केली.

शांता गोखले आणि किरण नगरकर एकत्र शिकायला होते त्या काळाबद्दल त्या सांगतात, रा. भा. पाटणकर यांच्या केबिनमध्ये नगरकर आणि त्या अनेक मंडळींसोबत गप्पा मारत, चर्चा करत, वाद-विवाद करत. त्यांच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद किरण नगरकर यांच्या बहिणीने केला होता. 7-8 दिवस नगरकर आणि शांता गोखले यांनी एकदंरीत तो अनुवाद एक एक वाचत तपासला. शांता गोखले त्यांना म्हणाल्या की, अनुवाद चांगला झालाय, पण त्याच्यात किरण तुझा आवाज येत नाही. त्यामुळे तो अनुवाद बाजूला टाकला.

पुढे नगरकरांच्या अनेक कादंबऱयांचे वाचन शांता गोखले यांनी केले. अभिप्राय दिला. विशेषता ‘गॉडस् लिटिल सोल्जर’ ही कादंबरी जमलेली नाही हे त्यांनी किरण नगरकर यांना सांगितलं. आणि थोडय़ा नाराजीणेच नगरकर यांनी हा अभिप्राय स्वीकारला.

अरुण कोलटकर आणि नगरकर दोघेही द्वैभाषिक लेखक होते मात्र नगरकर नंतर ते इंग्रजीतच लिहू लागल्या, पण त्यांच्या सगळ्या लेखनाचा अनुवाद अत्यंत उत्कृष्टपणे रेखा सबनीस यांनी केला. इतका की ते इंग्रजीत होते हे सांगूनही पटणार नाही. ‘रावण आणि एडी’ ही माझी आवडती कादंबरी. तिच्या फक्त पावणेतीनशे प्रति खपल्या. असं मला प्रकाशकांनी सांगितलं. मात्र पेंग्विन प्रकाशन जेव्हा हिंदुस्थानात तेव्हा खऱया अर्थाने पुस्तकं काढू लागलं तेव्हा रावण आणि एडी हे महत्त्वाचं पुस्तक होतं. नगरकरांची पुस्तक काही युरोपीयन भाषेत अनुवादित झाली, पण काही जर्मन भाषेतील अनुवादित पुस्तकांनी खपाचा उच्चांक गाठला.

मी टु चळवळीत त्यांचे नाव घेतले गेले आणि त्यांच्यावर डाग लागला तो कायमचाच. त्यातील एकीने स्वतःचं नाव न जाहीर करता. नगरकरांनी आरोपांना उत्तर दिले आणि आपल्याकडून गैरवर्तन झाल्याचं नाकरल. पण आरोपांचा परिणाम व्हायचा तो झालाच. आरसेनिष्ट ही त्यांची सर्वात अलीकडची कादंबरी छापायला पेंग्विनने नकार दिला.

नगरकरांच्या रावण आणि एडी कादंबरीचं कौतुक करताना सई परांजपे म्हणाल्या, मला लोक मुंबईच्या चाळींचं समर्थ चित्रण करणारी म्हणून ओळखतात. पण ही कादंबरी वाचल्यावर हा किताब आता मी खुशीने नगरकरांना बहाल करते आहे. अशी दाद ज्याला मिळते तो लेखक भाग्यवान असतो. नगरकर असे लेखक होते.

 [email protected]