दुबईत दोन आंबे चोरणे पडले महागात, हिंदुस्थानी नागरिकाला होऊ शकते शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एका हिंदुस्थानी तरुणाला (27) प्रवाशाच्या सामानातून दोन आंबे चोरणे महागात पडले आहे. त्याच्याविरोधात येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून त्याने गुन्हाही कबूल केला आहे. तेथील कायद्याप्रमाणे चोरीचा गुन्हा केल्यास दोषीला अजब शिक्षा दिली जाते. त्यामुळे या तरुणालाही अशीच काही अजब शिक्षा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी 23 सप्टेंबरला न्यायालय अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण 2017 साली घडले असून या तरुणाने 6 दिनार किंमतीचे आंबे चोरले होते. हिंदुस्थानात पाठवण्यात येणाऱ्या सामानातून आंबे चोरल्याची कबुली दोषी तरुणाने न्यायालयासमोर दिली होती. खलीज टाईम्सनुसार तरुणाने तहान लागल्यामुळे व आजबाजूला पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशाच्या सामानातील फळांच्या बॉक्समधून दोन आंबे चोरल्याचे न्यायालयाला सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी एप्रिल 2018 मध्ये त्याला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. फळे चोरल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. दुबई विमानतळावर एक कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डींग तपासत होता. त्यावेळी त्याला एक कर्मचारी हिंदुस्थानमध्ये पाठवण्यात येत असलेल्या सामानातील बॅग उघडत असल्याचे दिसले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.