
> > प्रदीप म्हात्रे
वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीही तिहेरी तलाक, मुस्लिम महिलांच्या पोटगीचे प्रश्न, शरियत, हलाला, दत्तक मुलं आदी प्रश्नांवर सय्यदभाई तेवढय़ाच पोटतिडिकीने लढत आहेत. समान नागरी कायद्याबाबतही त्यांचा लढा सुरू असून ‘बलात्कारमुक्त हिंदुस्थान अभियान’देखील ते राबवणार आहेत. विद्यमान सरकारने केलेला तिहेरी तलाकविरोधी कायदा आणि शिक्षेची तरतूद हे सय्यदभाईंसारख्या निरलस कार्यकर्त्याच्या निस्पृह समाजसेवेचे यशच आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून तिहेरी तलाकपीडित मुस्लिम महिलांच्या न्याय, हक्क व पुनर्वसनासाठी अथक प्रयत्न करणाऱया आणि तिहेरी तलाक पद्धत बंद पाडण्याकरिता दीर्घकाळ लढणाऱया पुण्याच्या सय्यदभाईंना चतुरंग प्रतिष्ठानचा सामाजिक जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला. सय्यदभाई हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव सय्यद मेहबूब शहा काद्री ऊर्फ सय्यदभाई. त्यांचा जन्म 6 एप्रिल, 1936 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांची आई व विधवा मावशी नवाबाच्या घरी काम करीत. घरची परिस्थिती तशी बेताचीच, पण त्याही परिस्थितीत त्यांच्यावर योग्य संस्कार घडले. 1940 साली त्यांच्या वडिलांना ब्रिटिश सैन्यातील गोऱया अधिकाऱयाकडे काम मिळाल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षी सय्यदभाई पुण्यात आले. चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण उर्दूतून झाले; मात्र अभ्यासात हुशार असणाऱया सय्यदभाईंना घरच्या बिकट परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही. छोटी-मोठी कामे करीत आई-वडिलांना मदत करणं त्यांना क्रमप्राप्त होतं. तथापि वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी नोकरी कोण देणार हाही प्रश्न होताच. नोकरीचा शोध घेत त्यांनी भारत पेन्सिल कंपनी गाठली. कंपनीचे मालक तात्या मराठे यांच्याकडे मिळेल ते काम करण्याची इच्छा दर्शवली. सुरुवातीला पेन्सिल धुण्याचे कठीण काम करण्यापासून त्यांनी पुढे अनेक पदांवर कामं केली. इतकेच नव्हे तर कंपनीच्या पडत्या काळात मेहनत करून पुन्हा फायद्यात आणली. लहानपणी सय्यदभाईदेखील अन्य सामान्य मुस्लिम पुरुषाप्रमाणे सनातनी मुस्लिम होते. ते दिवसातून पाच वेळा नमाज पठण करीत. समाजात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ मुस्लिम धर्मातच आहेत, अशी त्यांचीही धारणा होती. मात्र त्याला छेद गेला तो त्यांच्या विसाव्या वर्षी. त्यांच्या बहिणीला अठराव्या वर्षी काही कारण नसताना तिहेरी तलाकला सामोरे जावं लागले; तिचे चौदाव्या वर्षी लग्न झाले होते आणि तलाकच्या सुमाराला तिच्या पदरी दोन मुले होती. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सय्यदभाईंनी मुल्ला-मौलवींसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठत व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या, पण त्यांना समाधानकारक उत्तर सापडले नाही. कोणी सांगितले की, ‘तुझ्या बहिणीने एवढं सोसलं आहे तर तिला मरणपश्चात जन्नत प्राप्त होईल.’ कोणी सांगितलं ‘तुम अभी बच्चे हो!’ तर कुणी म्हणाले ‘ही तर अल्लाची मर्जी! अशा प्रतिक्रिया ऐकल्यावर ‘बहीण ज्या नरकयातना सोसतेय, त्याचं काय?’ असा प्रश्न त्यांना पडला. येथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि मुस्लिम समाजातील एक सत्यशोधक तसेच तलाकपीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता जन्माला आला. मुस्लिम समाज प्रबोधनकर्ते हमीद दलवाई यांची त्यांनी भेट घेतली व ते या चळवळीशी कायमचे जोडले गेले. 22 मार्च 1970 रोजी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. त्यांनतर पुणे, मुंबई, सातारा यासह महाराष्ट्रात आणि देशभरात तलाकपीडित महिलांच्या परिषदा झाल्या आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळालं.
सभा-परिषदांपुरतं मर्यादित न राहता सय्यदभाईंनी वैयक्तिकरीत्यासुद्धा शेकडो महिलांना त्यांची अडचण समजावून घेत मार्गदर्शन केलं. अर्थात हे करत असताना त्यांना आणि संघटनेला काही हल्ल्यांसह अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण त्यातूनही हे काम सुरू राहिलं. हमीद दलवाईंच्या पश्चात संघटनेची धुरा सय्यदभाईंकडे आली. लौकिक शिक्षण अर्धवट असले तरी सय्यदभाईंना या संस्थेच्या माध्यमातून बरंच काही शिकता आलं. बहुभाषा अवगत असणाऱया सय्यदभाईंनी आपले विविध छंद बाजूला सारून केवळ मुस्लिम महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी स्वतःला वाहून घेतलं. आज वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीही सय्यदभाई तिहेरी तलाकनंतर मुस्लिम महिलांच्या पोटगीचे प्रश्न, शरियत, हलाला, दत्तक मुलं आदी प्रश्नांवर तेवढय़ाच पोटतिडीकीने लढत आहेत. समान नागरी कायद्याबाबतही त्यांचा लढा सुरू असून ‘बलात्कारमुक्त हिंदुस्थान अभियान’देखील सय्यदभाई राबवणार आहेत. सय्यदभाईंनी केलेलं काम प्रेरणादायी आहे. ‘दगडावरची पेरणी’ हे त्यांचे आत्मकथन. त्यांनी हाती घेतलेले कार्य एकप्रकारे ‘दगडावरची पेरणी’च आहे. विद्यमान सरकारने केलेला तिहेरी तलाकविरोधी कायदा आणि शिक्षेची तरतूद हे सय्यदभाईंसारख्या निरलस कार्यकर्त्याच्या निस्पृह समाजसेवेचे यशच आहे. त्यांनी केलेल्या ‘दगडावरील पेरणी’ला जणू या कायद्यामुळे अंकुरच फुटला असे म्हणावे लागेल.





























































