
ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी चार हजार रुपयांची लाच मागताना राहाता येथील पोलीस कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये यासाठी बाळासाहेब गोपीनाथ बाचकर या पोलीस कर्मचाऱ्याने दहा हजार रूपयाची लाच मागितल्याची तक्रार नगरमधील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने दाखल केली होती. तडजोडीनंतर चार हजार रूपये देण्याचे ठरले होते. दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या पथकाने सापळा लावून शनिवारी राहाता शहरात पोलीस कर्मचारी बाचकर यास चार हजाराची लाच तक्रारदाराकडून घेताना पंचासमक्ष रंगेहात पकडले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
































































