
आर्थिक मंदीचा फटका सरकारी कंपन्यांनाही बसला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (हाल) आणि स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) या सरकारी कंपन्यांनी मंदीतून सावरण्यासाठी कर्मचार्यांच्या रजेचा पगार देणे बंद केले आहे.
कंपनीतील निर्मिती प्रक्रियेसाठी उपलब्ध निधीचा आणखी प्रभावीपणे वापर करण्यासाठी रजेचा पगार देणे बंद केल्याची माहिती ‘भेल’ने आपल्या कर्मचार्यांना दिली असल्याचे वृत्त एका इंग्रजी नियतकालिकाने दिले आहे. बाजारात मागणी कमी झाल्याने खर्च वाचवण्यासाठी रजेचा पगार बंद केला गेल्याची माहिती कंपनीचे प्रवक्ते गोपाळ सुतार यांनी दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचाच रजेचा पगार बंद करण्यात आला असून निवृत्त कर्मचार्यांना मात्र सर्व आर्थिक लाभ दिले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिकार्यांच्या पगारावरही गदा
‘हाल’ कंपनीचेही असेच हाल झाले आहेत. कर्मचार्यांचा पगार देण्यासाठीही कंपनीला बँकांकडून ऍडव्हान्स घ्यावा लागत आहे. बीएसएनएलनेही लँडलाइन आणि ब्रॉडबॅण्ड लावण्यासाठी ठेवलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरणार्या अधिकार्यांना दंड बजावण्यास सुरुवात केली आहे. चालू महिन्याच्या पगारातून ही दंडाची रक्कम कापली जाणार आहे. कर्मचार्यांनी पुढच्या महिन्यात आपले मागील लक्ष्य पूर्ण केले तर त्यांचा कापलेला पगार त्यांना परत दिला जाणार आहे. गेल्या जून महिन्यापासूनच्या तीन महिन्यांमध्ये कामगिरी समाधानकारक नसल्याने कोल इंडिया कंपनीने आपल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पगारात कपात करण्याचा विचार केला होता, परंतु नंतर तो प्रस्ताव रद्द करण्यात आला.
महिंद्रा, अशोक लेलँड 15 दिवस बंद!
मंदीच्या महामारीचा जबरदस्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला असून देशातील क्रमांक दोनची ऑटो कंपनी महिंद्राने आपले देशभरातील उद्योग 15 दिवसांसाठी बंद करण्याचे जाहीर केले आहे. हिंदुजा उद्योग समूहाची अशोक लेलँड कंपनीही 15 दिवस बंद ठेवण्यात येणार असून या काळात कोणतेही उत्पादन होणार नाही.

























































