
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्याबद्दल आणि त्यानंतर घातलेल्या निर्बंधांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनीही कश्मीरमधील आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना भेटण्याची परवानगी द्यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यांच्यासह कश्मीरचे नेते सज्जाद लोन, खासदार आणि एमडीएमकेचे नेते वायको, बाल हक्क कार्यकर्ते इनाश्री गांगुली, प्राध्यापक शांता सिन्हा आणि कश्मीर टाईम्सच्या संपादिका अनुराधा बसिन यांनीही 370 कलामाविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.
कश्मीरमधील जनजीवन विस्कळीतच
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याच्या 42 व्या दिवशीही अनेक भागांतील दुकाने बंदच आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरळीत सुरू नाहीत. श्रीनगरच्या आठवडा बाजारात तुरळक किरकोळ विक्रेते आणि फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली होती. काही भागांत अजूनही कडक पोलीस बंदोबस्त आहे.
























































