
मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले काँग्रेसचे कर्नाटकचे नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे शिवकुमार यांचा मुक्काम 1 ऑक्टोबरपर्यंत तिहार जेलमध्ये असणार आहे.
पण, त्या आधी शिवकुमार यांची संपूर्ण वैद्यकीय चाचणी केली जावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावेळी डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती व्हायला सांगितले तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. जर तशी गरज नसेल तर शिवकुमार यांना तिहारमध्ये पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, शिवकुमार यांची पहिल्यांदा चौकशी करायची परवानगी द्यावी, अशी मागणी ईडीने न्यायालयाकडे केली होती. मात्र, त्यांची प्रकृती पाहता त्यांना पहिल्यांदा रुग्णालयात नेण्यात यावे आणि नंतरच चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.




























































