
मेट्रोचे अधिकारी आरे प्रकरणात धादांत खोटं बोलत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज जन आशीर्वाद यात्रेसाठी अंबरनाथमध्ये आलेले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
विकास कुणाला नकोय? तो आम्हालाही हवाय असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले पण भूमिपुत्रांना आणि पर्यावरणाला नष्ट करून होणारा विकास आम्हाला नकोय. नाणारबाबत स्थानिकांच्या भूमिकेला आमचं समर्थन असेल, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
आरेबाबत मात्र मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन खोटं बोलायला लावतात, असा आरोप आदित्य यांनी केला. मेट्रो 3 प्रकल्पासाठीही 3 हजार झाडं तोडली होती, ती नव्यानं लावली. पण आरेमध्ये फक्त झाडंच नव्हे, तर बिबट्या, अजगर आणि इतर अनेक दुर्मिळ प्राणीसंपदा आहे. त्यांचं यामुळे मोठं नुकसान होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
वरळीतून निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय जनता घेईल
वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय मी नव्हे, तर जनता घेईल, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले कुठून लढायचं हे निश्चित नसून संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे.



























































