मुद्दा – अतिरिक्त ताण नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बळीराम शिवराम भोसले

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेसोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे जादा गाडय़ा सोडल्या जातात. त्यातच कोकण रेल्वेकडे मोजक्याच गाडय़ांचा ताफा असताना त्याही गाडय़ा वेळेवर चालविल्या जात नाहीत. कोकणात धावणाऱ्या कोकणकन्या, राज्यराणी, तुतारी, मांडवी एक्प्रेस तसेच दादर-रत्नागिरी मडगाव, दिवा-सावंतवाडी मडगाव पॅसेंजर या नियमित गाडय़ांना नेहमीच गर्दी असते. कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झालेले नाही. त्यातच वरील सर्व गाडय़ांची एकेरी मार्गावरून दिवसरात्र अविरत दळणवळण सेवा चालू असते. त्याव्यतिरिक्त इतर राज्यांतून जाणाऱ्या-येणाऱ्या अतिजलद, मेल एक्प्रेस गाडय़ा, मालगाडय़ा, रो-रो सेवा यांची वाहतूकदेखील या मार्गावरून केली जाते. विशेष म्हणजे परराज्यांतील एक्प्रेस गाडय़ांकरिता कोकण रेल्वे मार्गावर कोकण रेल्वेच्याच सर्व गाडय़ांना सायडिंगला काढून त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. तासन्तास गाडय़ा थांबविल्या जातात. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेमार्गावर चालविल्या जाणाऱ्या विशेष गाडय़ांवर मर्यादा ठेवली पाहिजे. प्रतिवर्षी गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात येणाऱ्या जादा विशेष गाडय़ांची संख्या वाढत आहे. कोकण रेल्वेमार्ग सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी या मार्गावर अतिरिक्त गाडय़ांचा ताण वाढविणे योग्य वाटत नाही. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांकरिता एसटी महामंडळ, खासगी ट्रव्हल्सच्या गाडय़ाही मोठय़ा प्रमाणात प्रवासी सेवा पुरविणार आहेत. तरीही दरवर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या जादा गाडय़ांचे प्रमाण वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कोकणात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो. रेल्वेमार्गावर अतिवृष्टीमुळे बहुतेक वेळा दरड कोसळते. वारंवार लोहमार्ग खचला जातो. त्यामुळे कोकण रेल्वे ठप्प होते. त्यातच या मार्गावर अतिरिक्त गाडय़ांचा ताण पडला, सिग्नल यंत्रणा बिघडली, मुसळधार पावसाचा फटका बसला तर वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जादा गाडय़ांचा बोजवारा उडू शकतो. यामध्ये कोकणी माणूस भरडला जाईल. यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडय़ांचे नियोजन करताना विशेष दक्षता घ्यावी. प्रवाशांची जबाबदारी आणि सुरक्षा महत्त्वाची आहे. याबाबत दुर्लक्ष करू नये.