मनमोहन सिंग पाकिस्तानवर हल्ला करणार होते, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवरील ‘26/11’ दहशतवादी हल्ल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यातच जुलै 2011मध्ये मुंबईत पुन्हा एकदा तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमुळे संतप्रवृत्तीची व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचाही संयम सुटला होता आणि त्याच वेळी त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याचे ठरवले होते, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या ‘फॉर द रेकॉर्ड’ या पुस्तकात केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग एक सदाचरणी आणि संत व्यक्ती आहेत. परंतु पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरुद्ध होणाऱया दहशतवादी कारवायांमुळे ते कमालीचे संतप्त होते. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्याची धग शांत होत नाही तोच जुलै 2011मध्ये मुंबई तिहेरी बॉम्बस्फोटाने हादरली. या हल्ल्यामुळे त्यांचे हृदय पिळवटून गेले. पुन्हा जर का असा हल्ला झाला तर आपण पाकिस्तानविरुद्ध नक्कीच लष्करी कारवाई करू, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले होते, अशी आठवणही कॅमेरून यांनी आपल्या पुस्तकात काढली आहे.

2010 ते 2016 या दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधानपदी असलेल्या डेव्हिड कॅमेरून यांनी या काळात तीन वेळा हिंदुस्थानला भेट दिली. या दौऱयात त्यांना डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल आलेला अनुभव त्यांनी पुस्तकात मांडला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी आपले संबंध हे सौहार्दाचे होते, असेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. गोध्रा दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटन सरकारने बहिष्कार घातला होता. परंतु 2013ला तो आपण उठवला हे नमूद करण्यास मात्र ते विसरले नाहीत.