‘स्वच्छ’ राजकारणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गजानन सीताराम शेपाळ

बी. जे. खताळ पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकांहून अधिक काळ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळी 1944 पासून स्वच्छ राजकारण केले. समाजाने चेष्टा, कंटाळा करण्याच्या अगोदरच वयाच्या 65व्या वर्षी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला. 21 वर्षे आमदारकी आणि 15 वर्षे मंत्रिमंडळात सहकार, पाटबंधारे, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, शेती, नियोजन आदी खात्यांची जबाबदारी सांभाळली, पुढे 1980 नंतरच्या बदलत गेलेल्या राजकारणामुळे व्यथित होऊन 1985ला सक्रिय राजकारणातून अलिप्त झाले.

‘आश्वी’ हे गाव संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेलं गाव. 1960-70चं दशक. या गावात मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच येणाऱया भिकाजी जिजाबा उपाख्य बी. जे. खताळ पाटील यांचा सत्कार समारंभ आणि सभा आयोजित केली होती. माझे तीर्थरूप सीताराम ऊर्फ आप्पासाहेब शेपाळ यांच्याकडे त्या कार्यक्रमाची बरीच जबाबदारी होती. स्वागत गीत माझ्या मोठय़ा भगिनी वसुंधरा सीताराम शेपाळ (आताच्या वर्षा विश्वास काळे) आणि वडिल या दोघांनी गायिले होते. आज ही फार जुनी आठवण होण्याचं कारण म्हणजे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे त्यांच्या वयाच्या 101व्या वर्षी, दोन दिवसांपूर्वी निधन झाले.

वयाच्या 65व्या वर्षी म्हणजे सुमारे 1985ला राजकारणातून म्हणजे मंत्रीपद, आमदारकीपासून स्वेच्छेने ते दूर झाले. पुण्यात त्यांचा दोन वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 99व्या वर्षी सत्कार झाला होता. चष्मा नाही, कान तंदुरुस्त, उच्चार सुस्पष्ट. ‘99’ वर्षांचा हा योगी पुरुष साठीच्या ‘तरुणा’लाही लाजवील असा! आताच्या राजकारणावर भाष्य करताना खंत व्यक्त करून तेव्हा सत्काराला उत्तर देताना म्हणाले होते, ‘‘आमच्या वेळचे राजकारण हे त्यागाच्या पायावर उभे होते, आजचे राजकारण हे विविध पायांवर उभे आहे, जात-धर्म आणि पैसा या तिपाईवरचं आजचं राजकारण पाहिल्यावर मन फार नाराज होतं.’’ सुमारे एक-सव्वा तास त्यांनी अनेक गंभीर विषयांवर भाष्य करून विचार मांडले होते. आज त्यांचे विचार मात्र अजरामर असल्याची जाणीव होते. माझे वडील आणि कॅप्टन वि. वा. गुणे (काका) हे त्यांचे अत्यंत विश्वासातले होते. ते एक गोष्ट सांगायचे, ‘ढबू’ची ती आजही प्रत्येक बाबतीत लागू होते. एक ‘ढबू’ नाकर्त्या आणि नाठाळ मुलांना कष्टाला लावण्यासाठी कसे काम करतो हे एक बाप सांगतो अशी ती कथा असायची. प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भेट ही आशयसंपन्न असायची त्यांची!

त्यांच्या ‘राजेंद्र’ नावाच्या मुलाला, वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी संबंधितांनी विचारले होते, ‘‘खताळ साहेब आपले वडील का?’’ यावर राजेंद्र यांनी तेथे प्रवेश न घेता गोव्यातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. दादांनी वडिलांना सांगितलेली ही घटना! जसे वडील तत्त्वनिष्ठ तसाच राजेंद्रही (आताचे डॉ. राजेंद्र खताळ). बऱयाचदा परंपरेने पुढच्या पिढीला ‘गादीचा वारस’ म्हणून समाजात आणले जाते. खताळदादा हे या ‘कृती’ला अपवाद ठरले. अन्यथा आमदार, खासदार वा मंत्री या पदनामांमध्ये त्यांच्या मुलांची वा पुढच्या पिढीची नावे ऐकायला-वाचायला मिळाली असती.

संगमनेर-लोणी (प्रवरानगर) रस्त्यावर कोकणगाव नावाचे लहानसे गाव आहे. तेथे ‘भुर्ज्या’ (सावळय़ा भुर्ज्या) शिंदे नावाच्या एका अल्पभूधारक गरीब शेतकऱयाची जमीन गावाच्या शाळेसाठी घेण्याचा घाट गावकऱयांनी घातला होता. ‘गाव करी ते राव न करी’ अशी अवस्था होती. त्याला वडिलांनी खताळदादांसमोर उभे केले. त्यांनी तत्कालीन कलेक्टर अनिल कुमार लखिना यांना थेट फोन करून ‘‘सावळय़ा भूर्ज्या’ला दुसरी जमीन पोट भरायला नसल्याने ती जमीन शाळेला घेऊ नये’’ असा आदेश दिला. इथे ‘ती’ म्हण वडिलांमुळे बदलली. ‘राव करी ते गाव न करी’ असं झालं होतं. याचं सारं श्रेय जातं ते खताळ दादांकडे!

ते म्हणायचे, ‘‘मंत्र्याने स्वतः अभ्यास करीत रहावा. पी.ए., पी.एस.वर विसंबून राहू नये.’’ आजकाल फार थोडे मंत्री अभ्यासू असतात असे दिसून येते. एकदा शरद पवार हे पु.लो.द.चे आमदार असताना, दादांना भेटायला मंत्रालयात आले होते. माझे वडील दादांच्या दालनात बसले होते. पवार-खताळ संवाद भेट संपल्यानंतर खताळदादा हे पवार यांना सोडण्यासाठी थेट दरवाजापर्यंत आले हे वडिलांच्या ध्यानात आले. त्यांनी नंतर तसे जेव्हा दादांना विचारले की, ‘‘तुम्ही इतर कुणाला निरोप देताना दरवाजापर्यंत येत नाहीत असे का?’’ यावर ते म्हणाले ‘‘पंडित, (वडिलांना ते ‘पंडित’ नावाने संबोधायचे), हा माणूस उद्याच्या महाराष्ट्राच्या अन् देशाच्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा सूत्रधार ठरणार आहे हे मला माहीत आहे. त्याचा हा आदरभाव आहे.’ इतकी गुणग्राहकता दादांकडे होती. बॅ. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. त्यावेळचा हा प्रसंग.

लोणीच्या प्रा. हिराचंद्र ब्राह्मणे सरांनी त्यांची ‘मस्तानी महल’ ही कादंबरी माझ्या वडीलांना अर्पण केली म्हणून, त्या ‘कादंबरी’चा प्रकाशन समारंभ पुण्यात एसेम जोशी सभागृहात आयोजिला होता. तेव्हा ‘हस्ते प्रकाशन’ यासाठी आदरणीय खताळदादा आवर्जून आले होते. ती आईला ते ‘सूनबाई’ किंवा ‘मालतीबाई’ या नावाने संबोधायचे. त्यावेळीही त्यांनी तीर्थरूपांच्या आर्मीतील आठवणीपासून तर राजकारणातला सहकारी आणि त्यांचा मोठा मुलगा या नात्याने अनेक आठवणी सांगून आजच्या समाजातील जातीद्वेषांवर, धार्मिक अवडंबरावर टीका केली होती.

बी. जे. खताळ पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकांहून अधिक काळ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळी 1944 पासून स्वच्छ राजकारण केले. समाजाने चेष्टा, कंटाळा करण्याच्या अगोदरच वयाच्या 65व्या वर्षी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला. 21 वर्षे आमदारकी आणि 15 वर्षे मंत्रिमंडळात सहकार, पाटबंधारे, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, शेती, नियोजन आदी खात्यांची जबाबदारी सांभाळली, पुढे 1980 नंतरच्या बदलत गेलेल्या राजकारणामुळे व्यथित होऊन 1985ला सक्रिय राजकारणातून अलिप्त झाले. अंतरीचे धावे, गुलामगिरी, गांधी समजून घेताना, लष्करी विळख्यात पाकिस्तान ही काही त्यांची गाजलेली पुस्तके. सुभाषबाबू, सरदार पटेल यांची भाषणे त्यांनी बडोद्यात असताना आयोजित केलेली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात राजारामबापू पाटील, कृष्णराव धुळप, दादासाहेब जगताप, अण्णासाहेब शिंदे, उत्तमराव पाटील हे त्यांचे शिक्षणावस्थेपासूनचे मित्र नेहमी सक्रिय राहिले. इंदिराजींना थेट फोन करू शकणाऱयांपैकी ते एक होते.

वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी आणखी एक पुस्तक जेव्हा प्रकाशित केलं असे ते जगातील कदाचित एकमेव ठरतील.
कबीराने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली होती दोह्यातून… ‘‘हे देवा जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते एकटेच रडते अन् बाकीचे हसत असतात. तू मला असं बनव की, मी एकटाच हसेन आणि बाकी सारे रडत असतील…!’’
खताळ दादांनीदेखील अस्तित्वाला अशीच प्रार्थना केली असेल!

[email protected]