रसगुल्ल्याची अनाठायी लढाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश हिंगमिरे

खाद्यसंस्कृतीतून निर्माण झालेले पदार्थ त्या प्रदेशाचे वैशिष्टय़ म्हणून नेतृत्व करतात. दक्षिणेतल्या हैदराबादी बिर्याणीपासून उत्तरेतल्या छोले-भटुरेपर्यंत अनेक पदार्थ गोडीगुलाबीने या यादीत समाविष्ट झाले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून रसगुल्ला पश्चिम बंगालचा की ओडिशाचा यावर वादळी चर्चा सुरू आहे. या अनाठायी चर्चेचं उत्तर रसगुल्ल्याचा गोडवा हेच असावं.

हिंदुस्थान हा विविधतेने नटलेला देश म्हणून गणला जातो. निरनिराळ्या भाषा असलेल्या या एकसंध राष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतही प्रदेशानुसार विविधता पाहायला मिळत असते आणि बऱयाच वेळेला या खाद्य संस्कृतीतून निर्माण झालेले पदार्थ हे भारतवर्षातील त्या प्रभागातील वैशिष्टय़ म्हणूनही नेतृत्व करू लागलेले आहेत. दक्षिणेतल्या हैदराबादी बिर्याणीपासून ते उत्तरेतल्या छोले-भटुरेपर्यंत अनेक पदार्थांचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. असाच प्रसिद्ध असलेला पूर्व हिंदुस्थानातील रसगुल्ला सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. रसगुल्ला हा पश्चिम बंगालचा की ओडिशाचा यावर गेले काही महिने वादळी चर्चा चालू असलेली दिसत आहे. मूळ कारण सदर चर्चेला होते जीआय! जीआय म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन, ज्याला भौगोलिक उपदर्शन किंवा मानांकन असेही म्हटले जाते.

जीआय हा कायदा वैशिष्टय़पूर्ण पदार्थांची नोंदणी करण्यासाठी हिंदुस्थानने स्वीकारला आणि पहिली नोंद दार्जिलिंग चहाची या कायद्यांतर्गत 2003 साली केली गेली. मुळात हा कायदा जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यूटीओमधून (WTO) घेण्यात आला आणि त्यामागे महत्त्वाची भूमिका युरोपियन युनियनची होती. कारण त्यांना आपले वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ आणि विशेषकरून त्यांची अनेक पेये ही जगभरात पोहोचवायची होती आणि म्हणून त्यांनी डब्ल्यूटीओच्या माध्यमातून हा कायदा जगभरात प्रस्तावित केला आणि हिंदुस्थानने तो 2001 साली स्वीकारला. युरोपियन युनियनबरोबर डब्ल्यूटीओचा फायदा घेत आपले बरेच वैशिष्टय़पूर्ण पदार्थ जीआय करून घेतले आणि जगभरात त्यांचा प्रसारसुद्धा योग्यरीत्या केला. जगाला त्यांच्या पदार्थांच्या वैशिष्टय़ांची भुरळ घातली आणि त्याचबरोबर जगातले मार्केट त्यांनी आपल्या पदार्थांना मिळवून दिले, त्यामध्ये फ्रान्सची शॅम्पेन असो किंवा स्कॉटलंडची स्कॉच व्हिस्की असो किंवा स्वित्झर्लंडचे स्वीस चॉकलेट असो, या सर्वांना युरोपमध्ये जीआय मिळाले आणि त्यांनी त्यांचे हे पदार्थ इतर राष्ट्रांमध्ये पाठवले. त्याचबरोबर त्यांनी हिंदुस्थानातही त्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून दिली आणि हिंदुस्थानी मंडळी सदर पदार्थांच्या मोहात बऱयाच प्रमाणात वाहत गेली. संपूर्ण युरोपमधून 59 हजार शेतीजन्य पदार्थ जीआय नोंद केले गेले, तर एकटय़ा जर्मनीमध्ये 14 हजार शेतीजन्य पदार्थांच्या जीआयच्या नोंदी झाल्या, परंतु शेतीप्रधान देश असे म्हणणाऱया आपल्या हिंदुस्थानातून फक्त 96 शेती पदार्थांवर जीआय नोंद होऊ शकली आहे. अशी कमी नोंद होऊ शकलेल्या आपल्या पदार्थांच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे आपण आपापसात त्या पदार्थांच्या नोंदीसाठी झगडा करत राहिलो.

हिंदुस्थानातील अनेक वैशिष्टय़पूर्ण पदार्थ आपापसातील वादामुळे अनेक वर्षे जीआयच्या नोंदीपासून दूर राहिले. त्यामध्ये बासमती तांदूळ असो, हापूस आंबा असो किंवा कोल्हापूरची कोल्हापूरी चप्पल असो, या पदार्थांनी दहा-दहा वर्षे नोंदीसाठी आपापसात भांडणे केली आणि आजही यातील बऱयाच पदार्थांचा नोंदीवरून झगडा चालू आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती सध्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील रसगुल्ल्याच्या बाबतीत होत आहे. दोन्ही रसगुल्ल्यांची चव, रंग बनवण्याची प्रक्रिया वेगळी असली तरी दोन्ही राज्ये रसगुल्ला आमचाच या हट्टापायी एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. असे हे मतभेद जीआय नोंदीसाठी योग्य नाही. ओडिशा राज्याचे म्हणणे आहे की, जगन्नाथ पुरी येथे 56 भोगांमध्ये महत्त्वाचा प्रसाद म्हणून रसगुल्ल्याचा समावेश बाराव्या शतकापासून करण्यात आल्याच्या नोंदी आहेत, तर पश्चिम बंगालच्या मंडळींचं म्हणणं आहे की, एकोणिसाव्या शतकात त्याचा शोध हा पश्चिम बंगालमध्ये लावण्यात आलेला आहे. वास्तवात दोन्हीही रसगुल्ले हे जीआय नोंदीच्या कक्षेत येणारे आहेत. दोघांनाही जीआय मिळाला पाहिजे आणि दोघांनाही जीआय मिळाले, पण एकमेकांनी एकमेकांवर ताशेरे ओढल्याने काहीच फायदा होणार नाही याची समज सदर राज्यांनी घेणे आवश्यक आहे.
उलटपक्षी त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री ट्विट करून आमचा रसगुल्ला पहिला आणि त्याच्या जीआय नोंदीची सिद्धता कशी वेगळी आहे अशा आशयाने जनमानसात एक वेगळ्या प्रकारचा भाव पसरवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करीत आहेत.

आपल्या बासमतीच्या नोंदीच्या बाबतीत आपापसातील वादाचा फायदा पाकिस्तानच्या कराची ट्रेडमार्क ऑफिसने घेत बासमती तांदळाला ट्रेडमार्क दिला होता. तसाच फायदा अमेरिकेने बासमती तांदळाच्या जातीसारख्या पदार्थाचे पेटंट घेत या नावाचा उपयोग केला होता आणि त्यासाठी आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागला. हा बासमती तांदूळ हिंदुस्थानचाच आहे आणि त्याला जीआय मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागले. अशाच प्रकारची पुनरावृत्ती रसगुल्ल्याच्या बाबतीत होऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेत एकमेकांची वैशिष्टय़े मान्य करत एकमेकांना प्रोत्साहन देणे आणि हा पदार्थ हिंदुस्थानातला आहे, हिंदुस्थानातल्या मातीमध्ये निर्माण झालेला आहे. हा पदार्थ वेगवेगळ्या गुणधर्मांनी, वेगवेगळ्या गुणवैशिष्टय़ांनी नटलेला आहे आणि जगामध्ये तो मान्यता प्राप्त करू शकतो या आशयाने तो इतरत्र पाठविला पाहिजे. युरोपने जसे त्यांचे शेकडो पदार्थ हिंदुस्थानात जीआयच्या माध्यमातून आणले, परंतु आपले दुर्दैव असे आहे की, हिंदुस्थानातील केवळ एकच जीआय पदार्थ दार्जिलिंग चहा हा जीआयच्या माध्यमातून युरोपमध्ये जाऊ शकला. तसे पाहता हिंदुस्थानातील वैशिष्टय़पूर्ण पदार्थांची मोठी यादी तयार होऊ शकते आणि ती युरोपमध्ये हक्काची मोठी बाजारपेठ मिळवू शकते, पण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेत वादाला तोंड फोडण्यापेक्षा विविध गुणवैशिष्टय़ांचे जतन करून हिंदुस्थानचे भले कसे होईल, त्याचबरोबर तो वैशिष्टय़पूर्ण पदार्थ बनविणाऱया समूहाचे भले कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे.

रसगुल्ल्याची लढाई ही तशी अनाठायी आहे. एकेका जिह्यामध्ये अनेक जीआय होऊ शकतात. पश्चिम बंगालच्या एका जिह्यांमधून तीन प्रकारच्या आंब्यांचे जीआय झाले आहेत, तर मग वेगवेगळ्या खाद्यपदार्थांना का नाही जीआय मिळणार ? सदर राज्यांनी जीआयचा अजून सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रानेसुद्धा जीआय कायद्याचा सविस्तर अभ्यास केला तर इथल्या शेतकऱयांना तसेच विणकरांना आणि अनेक खाद्यपदार्थ करणाऱया शेकडो कुटुंबांना त्याचा फायदा होऊ शकतो. सुदैवाने महाराष्ट्रातील शेती पदार्थ जीआयमध्ये क्रमांक एकवर हिंदुस्थानात आहे, परंतु दुर्दैव असे आहे की, त्या नोंदीचा महाराष्ट्राला काहीच फायदा घेता आला नाही. महाराष्ट्रात अजून असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यांना जीआय मिळू शकतो आणि त्याचबरोबर त्या पदार्थांना तर जीवदान मिळेलच, शिवाय त्यावर अवलंबून असणाऱया हजारो-लाखो व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास साताऱयाचा कंदी पेढा तसेच मराठवाडय़ातील कुंथलगिरीचा पेढा, माहूरगडच्या रेणुकादेवीचा तांबूल या व अशा अनेक खाद्यपदार्थांना जीआय मिळाल्यास त्याचा फायदा निश्चितच रोजगार निर्मिती तसेच खाद्यसंस्कृती जपण्यास निश्चित होईल.

पश्चिम बंगालला लागून बांगलादेश आहे. आपल्या अंतर्गत लढाईचा फायदा बांगलादेशाने घेऊ नये. कारण की, तेथेही रसगुल्ला तयार होतो. बांगलादेश हा अखंड हिंदुस्थानचाच एक भाग होता, परंतु खाद्य संस्कृती ही हिंदुस्थानातच जन्माला आली. रसगुल्ला हा हिंदुस्थानातच जन्मला आणि त्याचा फायदा हिंदुस्थानातील जनतेलाच झाला पाहिजे. म्हणून लढाई न करता सामंजस्याने एकमेकांना सहकार्य करणे आणि आपल्या वैशिष्टय़पूर्ण पदार्थांना इतर राष्ट्रांच्या हाती लागू न देणे हेच सदसद्विवेकबुद्धीचे लक्षण ठरू शकेल.

(लेखक पेटंट आणि जीआय मानांकन तज्ञ आहेत)