इतिहास घडवणारे मासिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शशिकांत सावंत

अमेरिकेतील ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ या संस्थेचे ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे मासिक जगभर लोकप्रिय ठरले आहे. उच्चांकी खपाचे मासिक अशी ख्याती असणाऱया या मासिकाचा पहिला अंक 1888 वर्षातील आजच्याच तारखेला प्रकाशित झाला होता. 130 वर्षं एवढा दीर्घ पल्ला गाठणाऱया या मासिकाने वाचकांच्या मनातील आस्था आणि कुतूहल कायम जागृत ठेवले आहे.

माझ्या लहानपणीच जग काळ्या-पांढऱया रंगांचं होतं. साप्ताहिक-नियतकालिकं सर्व काळी-पांढरी असत. अगदी टीव्हीदेखील ब्लॅक ऍण्ड व्हाईट असायचा. हा काही नियतकालिकांची मुखपृष्ठच मात्र रंगीत असत उदाहरणार्थ मोहिनी. या साऱया जगात चांदोबा आणि किशोर हीच काय ती थोडी तयार रंगतदार मासिकं होती. पण एक दिवस मात्र या जगात एका रंगीत मासिकाचा प्रवेश झाला ते म्हणजे नॅशनल जिओग्राफीक. मी पाहिलेला पहिला अंक होता त्यात जिराफांना पाळणाऱया किंवा त्यांची देखभाल करणाऱया एका दाम्पत्याची गोष्ट होती. इंग्रजी वाचता येत नव्हते, पण छोटय़ा जिराफ बाळाला दूध भरवतानाचे वगैरे फोटो पाहून वाटलं की, हे सगळं कधीतरी वाचायला, माहीत करून घ्यायला हवे. त्याच्या मुखपृष्ठावर एका रंगीत वेश केलेल्या तरुणाचा त्यावेळी फोटो होता.

तेव्हापासून अनेक नॅशनल जिओग्राफीकचे अंक केवळ पाहणे किंवा फोटो कॅप्शन वाचण्याचा प्रयत्न करणे याच्यातून मनात साठत गेले. मग नॅशनल जिओग्राफीकने अनेक महत्त्वाचे अंक आणले. जेन गुंडालने चिंपाजीचा केलेला अभ्यास, त्याच्याबद्दल लिहिलेला लेख आणि तिचे फोटो हे सारे असलेला 50 वर्षांपूर्वीचा अंक. डायना फॉसिने लिहिलेला गोरिलावरचा लेख लिहिलेला अंक. हिंदुस्थानी रेल्वेवरचा पॉल थेरॉचा लेख आणि त्यातील अप्रतिम फोटो. ज्यात एका डब्यातून दुसऱया डब्यात दाराला लोंबकळत थाळी पास करतानाचा फोटो (अर्थात स्टीव्ह मॅकतीने काढलेला) आहे. मग मान्सूनवरचे लेखावरचेही त्यानेच काढलेले मान्सूनवरचे फोटो. असे अनेक अंक आता माझ्याकडे साठलेले आहेत. नॅशनल जिओग्राफीक संस्था सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापन झाली आणि मग मासिक निघू लागले. या मासिकाने आजतागायत आपल्या भोवतीच्या पर्यावरण, निसर्ग पृथ्वी, इतकंच नव्हे तर अवकाश आणि दूरवरच्या गॅलेक्सी यांचा जो माग घेतला आहे तो मानवी ज्ञानात निश्चित भर टाकणारा आहे किंबहुना नॅशनल जिओग्राफीक नसतं तर याबद्दल आपल्याला आवड निर्माण झाली असती का?

हबलने घेतलेले तारे बनतानाचे किंवा उद्ध्वस्त होतानाचे फोटो असतात किंवा मंगळावर जाऊन काढलेल्या फोटो जे या मासिकामुळेच पाहायला मिळाले. मंगळावरच्या फोटोंचा हा अंक संग्राह्य आहे याचं कारण थ्री डायमेन्शनल फोटो त्यात आहेत आणि त्याच्याबरोबर निळा-लाल पातळ प्लॅस्टिकच्या काचेचा चष्माही दिलेला आहे. नॅशनल जॉग्रफीने एकदा चक्क थ्री डायमेन्शनल मुखपृष्ट असलेला अंक सादर केला त्या पृथ्वीचा इतकंच नव्हे तर मागच्या बाजूला मॅकडोनल्डची जाहिरात होती तीही थ्री डायमेन्शनल होती. हे वाचण्याचे मासिक नव्हे असं वाटतं, पण त्यांचा टीनएजर मेंदूवरचा लेख असो की, नाईलवरचा लेख असो किंवा मेंदू संशोधनावरचे लेख असो किंवा सहारा वाळवंट, ऍमेझॉन अरण्य यावरचे लेख असोत ते विस्ताराने माहिती देतात.
यात सर्वोत्कृष्ट असे फोटो असतातच, पण बरोबरच नकाशेही मिळतात. नॅशनल जिओग्राफीकने जवळपास नाईल आणि इजिप्तवरचे आठ -नऊ लेख दिलेले आहेत ते सर्व मी जमवले आणि माझ्या एका मैत्रिणीला दिले. तिने नाईल नदीवर फिल्म बनवताना ते वापरले. त्यात आठ देशांमधून नाईल कशी वाहते हे दाखवणारा तर नकाशा होता. जो पाहून इजिप्तमधले लोकही चकित झाले.

सहारा वाळवंट असो इंका संस्कृती असो, रात्रीचे आकाश असो किंवा अमेरिका, युरोप असे अनेक मोठे नकाशे अनेकदा नॅशनल जिओग्राफीकच्या अंकात आढळतात आणि त्यातून एक वेगळाच आलेख आपल्यासमोर उभा राहतो. नॅशनल जिओग्राफीकने शंभर वर्षे पूर्ण केली तेव्हाचा अंक माझ्याकडे आहे त्यात प्राणी-पक्षी यांचे फोटो आहेतच, पण केवळ एक पायऱयांवर ठेवलेला पेरूचाही सुंदर फोटो आहे. आपल्याला छायाचित्रणाची आणि जगाकडे बघण्याची वेगळी दृष्टी हे फोटो देतात हे त्याचे मोठे यश आहे.

सिंदाबाद ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने तशाच जहाजातून जायचं एका अवलियाने ठरवलं त्याला सौदी अरेबियाच्या राजपुत्राने प्रायोजित केलं आणि चक्क तशीच शिडाची बोट बनवण्यात आली. पूर्वीच्या काळात बोटी पत्र्याने ठोकलेल्या नसत तर दोऱयाने विणलेल्या असतात. तसा दोर श्रीलंकेतून मिळविण्यात आला. एक भले मोठे झाड त्यासाठी विकत घेण्यात आले आणि त्यापासून दोर बनवून जहाजाची फळकुटे बांधला. अगदी तसाच सिंदबादच्या मार्गाने या पथकाने प्रवास केला. तो प्रवास आपल्याला नॅशनल जिओग्राफीकमध्ये वाचायला मिळतो.

व्यंकटेश माडगूळकर यांनी अशी माणसं अशी साहसं या आपल्या पुस्तकात सिंदबादच्या मार्गावरच्या या सफरीची ही अफलातून कथा दिलेली आहे. याच मंडळींनी ओडिसी महाकाव्यात जी ठिकाणे आढळतात त्या ठिकाणांवरून प्रवास केला. बर्फाच्छादित, अतिउंच शिखरे, अतिउंच झाडे, अतिदुर्गम गुहा, काळीज गोठवणारा अंटार्टिका प्रदेश आणि महिनोन्महिने त्यातून केलेला प्रवास यासारख्या कितीतरी एक्सपीडिशन्स म्हणजे जीवावर उदार होऊन केलेल्या भ्रमंतीला नॅशनल जिओग्राफीकने साथ दिली, आर्थिक मदत तर केलीच, पण त्यांना प्रसिद्धी दिली त्यांच्याबद्दलची माहिती भरभरून छापली. त्यामुळे जगभरात निसर्ग भ्रमंती, अज्ञात प्रदेश शोधण्याचे एक वेगळेच वेड हजारो-लाखो लोकांना लागले. नॅशनल जिओग्राफीक चॅनेल आल्यानंतर अर्थातच या मासिकाची लोकप्रियता वाढली, पण पुलं म्हणतात तसे अस्सल गवई जसा अर्ध शास्त्राrय संगीत गात नाही तसेच आमच्यासारखी अनेक मंडळी अंकावरच भरवसा ठेवतात.

या अंकात ज्ञानाचा खजिना समोर येतो जगातील मुंग्यांची संख्या ही माणसाच्या वजनापेक्षा जास्त असते, वाळवीला डोळे नसतात आणि ती केवळ सोसायटी करून राहते, हिमालयातील पर्वतराजींमध्ये, सहाराच्या वाळवंटात, टुंड्रा प्रदेशात माणसे कशी जगतात हे सारं नॅशनल जिओग्राफीक आपल्यासमोर आणून ठेवते.

माझ्या आवडीचे नॅशनल जिओग्राफीकचे विषय वेगळेच आहेत. त्यात लेखक आणि कलावंतांवरचे अंक मग त्यात परीकथा लिहिणाऱया ग्रीम भावंडांवरचा लेख, काही काळ व्हेन गॉग आर्लेसमध्ये व मध्ये जिथे राहिला त्यावरचा लेख, अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्टबद्दलचे आणि त्यांच्या कवितांत बरोबर केलेली सुंदर फोटोग्राफी त्यात आपल्याला गहन अरण्यातले व वाट पाहणारी झाडे दिसतात. वेथ आडनावाचे एक अमेरिकन कुटुंब केवळ चित्रकार कुटुंब म्हणून ओळखले जाते त्यांच्यावरचा केलेला अंक आणि त्यात गवताळ कुरणात पाठमोरी पडलेली तरुणी पाठमोरी पाहणारी तरुणी हे चित्र आजही डोळ्यासमोर आहे. थोडक्यात नॅशनल जिओग्राफीक हे मासिक निरंतर शिकवत राहणारं विद्यापीठ आहे.

[email protected]