स्वप्नं चोरीला जातायत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

अनेक वर्ष उराशी बाळगलेली स्वप्नं अधमुरी असतानाच हिरावली जातात. कुठंतरी आत कच्चकन इंगळा डसावा तसा दंश आणि वर उरलेले व्रण… या क्रणांच्या जखमा सावरत हृदयातली केदना पानाकर उतरते. कवितांना दाद मिळते. पण आतली सल, त्या आठवणी सारं गोठलेलं असतं एका अनिश्चित काळासाठी. काही वेदना कवित्व तर काही संवेदनाच हिरावून नेतात. स्वप्नं चोरीला जावीत तशा संवदेनाही चोरीला जातात असंच काहीसं वाटण्याजोगं…
स्वप्नं चोरीला जातायत…
शब्दांचा पाचोळा सळसळत दूर दूर उडून चाललेला…
पाखरं पिंजरे शोधतायत…
दुपार अवघड कडय़ाच्या टोकासारखी…
गर्दीच्या चरकात चेपत चिरडत मी चाललो होतो. घाम टिपत… कंपनीनं दहा हजार कामगारांना एकाएकी कामावरून कमी केलेलं… त्यात मी.. दहा हजारांतला एक…
वज्राघात… पायाखालून जमीन सरकणं… ब्रह्मांड आठवणं… वीज कोसळणं… तारे चमकावेत हे सारे एकाच वेळी घडलेले… सुन्न बधीर होऊन बसायलाही वेळ नव्हता. लवकरात लवकर दुसरी नोकरी शोधणं भाग होतं… बँकेचं कर्ज… हप्ते कसे चुकवणार? विजेचं बिल… घरभाडं… रेशन… गॅस…?
जिथं जिथं गेलो तिथे नकारच ठणकन आपटत होता. न्यायाधीशानं कठोर होत हातोडा आपटावा टेबलवर तसा… आता आता कुठे भविष्य नाक्यावरून हात हलवत हसत बोलावत होतं.. अस्तित्व पणाला लागलेलं. ही मायानगरी कुणाला उपाशी ठेवत नाही असं ऐकून गावातनं इथं आलो. काही दिवस वणवण… उपास… मिळेल ते काम… चाळीत खुराडय़ात दहा माणसांच्या बरोबर झोपत होतो… गाववाल्याच्या ओळखीनं एक वर्षानं कंपनीत नोकरी लागली. तर लगेच आईबापानं गावाची पोरगी शोधून मुहूर्त पकडून माझी रवानगी संसार नामक पिंजऱयात केली. गावची मुलगी असल्यानं पतीला परमेश्वरच मानत असल्यानं फार त्रास होत नव्हता. आशा-इच्छांना इतकी पोरंबाळं झाली की त्यात आमच्या मुलांना जन्म देण्याचा विचार करणं चूकच होतं. भाजीपावाबरोबर गॅस हवा, रेशनकार्ड हवं… डबे भांडी हवी… साडी हवी… हव्यास हव्यास वाढत गेला…
बघता बघता चाळीतल्या खोलीत मी संसारी जबाबदार माणूस झालो… आईच्या ऑपरेशनसाठी मुंबईला आणलं तेव्हा कर्ज उचललं. आई बरी होऊन गावी परत गेली न् माझं पैशाचं पाकीट आजारी पडून बरंच बारीक झालं… आणि आता हे… विचार करून मेंदू थकला होता न् खेटे घालून पाय थकत होते.
बायकोनं घरी गेल्यावर चहाचा कप ठेवला न् दागिने हातात ठेवले. मी गंभीर काळजीत खंतावत… तर ती निर्भाव… चेहऱयावर समंजस मऊपणा… दोन महिने भाजी, रेशन न् तुम्हाला बाहेर नोकरी शोधायला धावपळ करायला पुरतील इतके पैसे तर येतीलच.
मला थोडं बळ आलं… न् अचानक कानावर बातमी आदळली… शहरात प्रचंड महापूर… हजारो संसार वाहून गेले… टीव्हीवर एकेक दृश्य बघून बायको रडू लागली. मी घाईनं बापाला फोन लावला. तिथवर पाणी आलं नव्हतं. पण येण्याची शक्यता होती. मी तसंच उठून तातडीनं सोन्याच्या दागिन्यांचं रूपांतर नोटांमध्ये करायला धावलो.
तिच्याकडे थोडे पैसे ठेवून मी थोडंफार सामान घेऊन निघणार इतक्यात शेजारचे अण्णा आले… म्हणाले, ‘मीही येतो. मदतीला हजारो हात लागले तरच वाचलेले जीव तरी सावरतील.’ अचानक… चाळीतल्या खोल्यातनं सामान येऊन पडले… आपल्या डोक्यावर छप्पर आहे… घरात घर सावरणारी बायको आहे. कॉलेजात असताना वाचलेली कविता आठवली
‘ओळखलंत का सर मला’…
पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले…
केसावरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली…
गेली घरटय़ात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली
मोकळय़ा हाती जाईल कशी
बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली
होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये
पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे,
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे..
चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जातात
हसत हसत उठला
‘पैसा नको सर,
जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते ‘लढ’ म्हणा…!

हे सारे पाठीवरती कुणी हात न ठेवताही लढत होते… जीवनाशी… निसर्गाशी… वास्तवाशी… त्या अथांग पाण्याला पुन्हा म्हणावंसं वाटलं…
‘अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला….!

(दोन्ही कवितांच्या ओळी साहित्यसम्राट कुसुमाग्रज यांच्या आहेत.)

[email protected]