ठाण्यात साथीच्या आजारांनी घेतले 8 जणांचे बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा झालेला रेकॉर्ड ब्रेक पाऊस ठाणेकरांना भलताच बाधला असून सर्दी, खोकला, तापासह साथीच्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांनी छोटेमोठे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यातच गेल्या तीन महिन्यांत 8 जणांचा बळी घेतला असल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यू, मलेरियाने सातजण दगावले तर विविध आजारांनी तीन जणांना प्राण गमवावे लागले असल्याची सरकारी आकडेवारी आहे. यामध्ये जूनमध्ये एक जुलैमध्ये पाच तर ऑगस्टमध्ये दोन जणांचा बळी गेला. आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ करत आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे व्हायरल ऍटॅक वाढला असून विविध साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यातच कचऱ्याची दुर्गंधी, रस्त्यांवरील खड्डयांमध्ये साचलेले पाणी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव आदींमुळे मलेरिया, डेंग्यू आणि इतर तापांच्या रुग्णांमध्ये मोठय़ाप्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

नऊ महिन्यांत 10 रुग्ण मृत्युमुखी

जानेवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यांत हिवताप, डेंग्यू, साथीच्या तापामध्ये 10 रुग्ण मृत्युमुखी पडले. हिवतापाचे 6 रुग्ण आढळले असून एकाचा बळी गेला. डेंग्यूचे एकूण 71 रुग्ण आढळले असून 7 जणांना जीव गमवावा लागला तर इतर तापाने 2 जण मृत्युमुखी पडले.

  • ठाणे जिह्यातील महापालिका, नगरपालिकांसह ग्रामीण भागात सुमारे दहा ठिकाणी साथीच्या आजारांनी डोकेवर काढले.
  • बदलापूर येथील हनुमाननगरमध्ये ऑगस्टमध्ये हिवतापाचे सहा रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
  • ठाणे येथील वर्तकनगरमध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला.
  • उल्हासनगर महापालिकेच्या शांतीनगरमध्ये डेंग्यूच्या चार रुग्णांपैकी एकाचा बळी गेला.
  • कल्याण-डोंबिकलीमध्ये सर्वाधिक 26 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
  • मीरा-भाईंदर महापालिकेच्या काशिगावमध्ये डेंग्यूचे 16 रूग्ण सापडले. यातील एकाचा मृत्यू झाला.
  • शहापूरच्या आटगावमध्ये डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले असून एकाचा बळी गेला.
  • आधारकाडी, काडेघर परिसरातील 23 जणांना व्हायरल तापाची लागण होऊन एकाचा त्यामध्ये मृत्यू झाला.