
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून पळालेल्याला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली. साहिल सेवा अरोरा असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणी ही मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. ती नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली होती. नुकतेच तिने एका वेबसाईटवर तिची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर एका व्यक्तीने तिला मेसेज करून साहिलचा नंबर दिला. साहिल हा दिल्लीतील व्यावसायिक असून तो नोकरी देईल असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर साहिलने तरुणीला फोन केला. आपण सध्या दिल्लीत असून मुंबईत आल्यावर नोकरीचे बघू असे तिला सांगितले.
गेल्या आठवड्यात त्याने तिला जुहू येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तिथे ते दोघे भेटले. काही वेळानंतर साहिलने तिला रूम मध्ये नेले. धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याने फोटो काढले होते. ते फोटो वडिलांना दाखवेन अशी तिला धमकी दिली. तरुणीने घडल्या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. साहिलने मोबाईल बंद केला होता. रविवारी तो मित्राला भेटण्यासाठी अंधेरी लोखंडवाला परिसरात येणार असल्याची खबर जुहू पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा रचून साहिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे.



























































