
काबाडकष्ट करणाऱ्या, स्वतःसाठी न जगता आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या ‘माऊलीं’ साठी, त्यांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘माऊली संवाद’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोहोचलो आहे. याचे सर्व श्रेय तुमचे आहे, चांगला विचार करायचं, हसत-खेळत जीवन जगायचं, आदेश भाऊजींनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तसाच शिवसेनेने सुद्धा कधी तडा जाऊ दिला नाही. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे. धनुष्यबाण हाच आपला उमेदवार, धनुष्यबाणावर विश्वास ठेवा, असे वक्तव्य शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी मंगळवारी माऊली मेळाव्यात केले.
माउली संवादामध्ये नगरचे रस्ते, वीज, पाणी, मुलींची सुरक्षा, घरकुल यासह विविध प्रश्नांसंदर्भात माउलींनी प्रश्नांचा भडीमार केल्यावर त्याला दिलखुलास उत्तरे बांदेकर यांनी यावेळी दिली. सुमारे दोन तास हा माऊली संवाद पार पडला.
दिल्लीगेट येथील पटांगणामध्ये ‘माऊली संवाद’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे संपर्कप्रमुख रुपेश पाटील, महिला आघाडी संपर्कप्रमुख अश्विनी मते, शहर प्रमुख दिलीप सातपुते, यांच्यासह नगरसेवक तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, युवासेनेचे युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड यांच्यासह नगरसेवक नगरसेविका, युवासेना, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की, माऊली संवादाचा हा चौथा टप्पा सुरू झालेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वांनासोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे, म्हणून माऊलींच्या मनातील प्रश्न हे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या माउली संवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. माऊली संवादांमध्ये प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला.
शिवसेना आज नाही तर अनेक वर्षापासूनची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये ती भिनलेली आहे. मलासुद्धा संघटनेने मोठं केलं. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं. हे फक्त शिवसेनेमध्येच होतं, असे बांदेकर यांनी सांगून, आज अनिल भैय्यासारखे अनेक शिवसैनिक पदाधिकारी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झगडत आहेत. अनेकांना कधी पदे मिळाली नाहीत मात्र त्यांनी कधी भगव्याची साथ सोडली नाही. आपला उमेदवार धनुष्यबाण आहे, हाच निर्धार करा, आपल्या घरातील प्रत्येक जण आनंदित राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही यावेळी बांदेकरांनी देताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी नगरसेवक संजय शेंडगे, अमोल येवले, सुभाष लोंढे, पुष्पा बोरुडे, सुरेखा कदम, शशिकला राठोड, रोहिणी शेंडगे, उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, गिरीश जाधव, अनिल बोरुडे, संतोष गेनाप्पा, अशोक दहिफळे, संभाजी कदम, अशोक बडे, राम नळकांडे, गौरव ढोणे, मदन आढाव, रावजी नागरे, मेहुल भंडारी मंदार मुळे, अरुण गोयल, निर्मला धुपधारे, भोसले, सुषमा पडोळे आदी उपस्थित होते.



























































