
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तापुढे झुकणं आम्हाला माहीत नाही. माझ्या आयुष्यात गुन्हा दाखल होण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. तरीही शिखर बँक घोटाळ्याप्रकारणी 27 तारखेला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात स्वतः जाणार आणि ईडीचा पाहुणचार घेणार, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत केले.
ईडीने दाखल केलेल्या गुह्याबाबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ईडीने माझ्यावर शिखर बँक प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मी कुठल्याही बँकेचा संचालक नाही. तरीही माझ्यावर नक्की गुन्हा काय दाखल केला आहे ते मला समजून घेतलं पाहिजे. ते मी जाणून घेणार असून ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार. संपूर्ण महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर मी एकदम अदृश्य झालो असं वाटू नये म्हणून या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे. ईडीच्या अधिकार्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन. या प्रकरणी तपास करणार्या सर्व यंत्रणांना मी सहकार्य करणार असल्याचेही पकार म्हणाले.
अशी कारवाई होण्याचा हा दुसरा प्रसंग
अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग आहे. 1980 साली अमरावतीमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात मला अटक करण्यात आली होती, मात्र माझ्या बाजूने निकाल लागला व प्रश्नच शिल्लक राहिला नाही, याचीही आठवण शरद पवार यांनी करून दिली.
निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा, लोक काय ते समजतात!
राज्य सहकारी बँक ही महत्त्वाची बँक आहे. ही बँक सगळ्यांना अर्थसहाय्य देते. सध्या ज्या कालखंडाबाबत चौकशी होते आहे, त्या संचालक मंडळात कोणत्याही एका पक्षाचे संचालक नक्हते. ही सर्वपक्षीय सदस्य बँक आहे. मी राज्य सहकारी बँकेचा संचालक का सदस्य कधीच नव्हतो असेही त्यांनी सांगितले. खोलात जाऊ इच्छित नाही. राष्ट्रवादीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे, अशी लोकांना शंका आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे झाल्याने लोक काय ते समजतात, असाही टोला त्यांनी लगावला.
























































