मोदी, डोवाल यांना ठार मारण्याचा ‘जैश’चा कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-doval-modi

बालाकोटमधील ‘जैश-ए- मोहम्मद’चा पंचतारांकित प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केल्याने आणि कश्मीरमधून 370 कलम हटवल्याचा वचपा काढण्यासाठी जैशने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरच हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चा मेजर ‘जैश’च्या दहशतवाद्यांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देत आहे. दरम्यान, या कटाच्या पार्श्वभूमीवर, डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा नव्याने आढावा घेण्यात आला आहे.

एका परदेशी गुप्तचर संस्थेला पाकिस्तानचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याचा म्होरक्या यांच्यातील लिखित पत्र सापडले. त्याची माहिती त्यांनी हिंदुस्थानी गुप्तचर संस्थेला दिली. या पत्रानुसार मोदी आणि डोवाल यांच्यावर सप्टेंबर महिन्यांत दहशतवादी हल्ला करण्याचा ‘जैश’च्या विशेष प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवादी पथकाचा कट आहे.

हिंदुस्थानी हवाई तळही निशाण्यावर

पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यासह हिंदुस्थानी हवाई तळांवरही ‘जैश-ए-मोहम्मद’चे विशेष प्रशिक्षित दहशतवादी पथक आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे. बालाकोटची दहशतवादी तळ हिंदुस्थानी हवाई दलानेच उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे ‘जैश’च्या निशाण्यावर हिंद्स्थानी हवाई तळही आहेत. त्या पार्श्वभूमीवर, श्रीनगर, अवंतीपूर, जम्मू, पठाणकोट आणि हिंडन हवाई तळांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही नुकतेच बालाकोटचा दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ पुन्हा सुरू झाल्याचे म्हटले होते.

30 शहरांना अलर्ट जारी

हल्ल्याच्या कटाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयूपर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह देशातील 30 शहरांतील पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. डोवाल यांच्या सक्षम रणनीतीच्या जोरावरच हिंदुस्थानने उरी आणि पुलवामा हल्ल्याचे जोरदार उत्तर सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या रूपाने पाकिस्तानला दिले होते.