जागतिक कुस्तीवीरांच्या यादीत दीपक पूनिया ‘नंबर 1’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या हिंदुस्थानच्या दीपक पूनिया याने जागतिक मानांकनात अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. या स्पर्धेत दुखापतीमुळे जरी दीपकला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं असलं तरी 86 किलो फ्रीस्टाईल कुस्तीप्रकारात तो प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगतर्फे जाहीर केलेल्या मानांकनात 82 गुणांसह दीपक प्रथम क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर विश्वविजेतेपद मिळवणारा इराणचा हसन याजदानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे अजिंक्यपदाच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारा बजरंग पूनिया याच्या मानांकनात मात्र घसरण झाली आहे. तो 65 किलो वर्गात 63 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाचा गादजिमूराद राशिदोव हा कुस्तीपटू 72 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे.

57 किलो वजनी गटात रवी दहिया हा पहिल्या पाचामध्ये पोहोचला आहे, तर 61 किलो वजनी गटात राहुल आवारे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांच्या मानांकनात आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णकामगिरी करणारी हिंदुस्थानची विनेश फोगट ही 53 किलो वजनी गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.