
पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी समुद्री मार्गाने हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी शक्यता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. दहशतवादी देशात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याचे सिंह यांनी केरळमधील कोल्लममध्ये सांगितले. त्यामुळे लष्कर आणि नौदलाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपले नौदल कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थानच्या कुरापती काढणाऱ्या कोणालाही आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असेही त्यांनी ठणकावले. यावेळी त्यांनी सर्जिकल आणि एअर स्ट्राईकचाही उल्लेख केला.
आपल्या देशाला मोठ्या सागरी सीमा लाभल्या आहेत. कच्छपासून केरळपर्यंतच्या सागरी सीमेवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. मात्र, आपली सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी नौदल सज्ज असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश विसरू शकत नाही. मात्र, या हल्ल्यानंतर हवाई दलाने एअर स्ट्राईक करून बालाकोटमधील दहशतवाद्यांची ठाणी उद्ध्वस्त केली. आम्ही कोणालाही त्रास देत नाही. मात्र, आमची कुरापत काढणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
























































