आयुष्यमान कार्ड असूनही उपचारांविना वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनतेच्या भल्यासाठी केंद्र सरकार ‘आयुष्मान’ कार्डद्वारे आरोग्याच्या सुविधा पुरवते, पण खासगी रुग्णालयांमध्ये त्या कार्डाला कवडीइतकीही किंमत नाही याचीच प्रचीती देणारी घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली. एका 59 वर्षीय वृद्धाकडे हे कार्ड असूनही उपचारांविना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागाने याप्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बरेली येथे राहणारे मतबूल हुसेन (59) यांची तब्येत बुधवारी रात्री अचानक बिघडली. हुसेन यांच्याकडे ‘आयुष्मान’ कार्ड होते. ते घेऊन त्यांचे परिजन त्यांना नजीकच्या खासगी बडय़ा रुग्णालयात घेऊन गेले, पण त्या कार्डचे नाव ऐकताच हुसेन यांना दाखल करून घेण्यास रुग्णालयाने साफ नकार दिला. अशा प्रकारे चार बड्या रुग्णालयांनी हुसेन यांना परत पाठवले. त्यांचे कुटुंबीय रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत भटकत होते, पण त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. अखेर उपचारांविना त्यांचा मृत्यू झाला.

काय आहे ‘आयुष्मान’ योजना?

‘आयुष्मान भारत’ नावाच्या या योजनेला पंतप्रधान जन आरोग्य योजना असेही संबोधले जाते. मोदीकेअर नावाने प्रसिद्ध असलेली ही योजना म्हणजे देशातील गोरगरीबांसाठी हेल्थ इन्शोरन्स स्कीम आहे. याअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबांना वर्षाकाठी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबाचा आकार किंवा वयाचे कोणतेही बंधन नाही.