
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांच्या राजीनाम्याला ‘गृहकलय’ कारणीभूत असल्याचे माध्यमातून रंगवण्यात आले. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार भावुक झाले. आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही, कृपया करुन तसं काहीही अफवा पसरु नका, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना अजित दादा म्हणाले की, आमचे कुटुंब एकत्र असून पवार साहेबांचा निर्णय कुटुंबात अंतिम मानला जातो. शरद पवार हे कुटुंबाचे प्रमुख असल्याने त्यांचा शब्द पाळला जातो. सुरुवातीला राजकारणात सुप्रिया आल्यावरही असेच उकरले, आता नुकतेच पार्थही राजकारणात आल्यावर पुन्हा तेच, आता रोहित आल्यावरही पुन्हा तेच, असे म्हणत आमच्याच कुठलाही गृहकलह नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांना अश्रू अनावर झाले. शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, विशेष म्हणजे कुटुंबातील कलहाबाबत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सिंचन घोटाळ्याबाबत काय म्हणाले?
सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करताना अजित पवारांनी यापूर्वीही 72 हजार कोटींचा घोटाळा असं म्हटलं. तर, आताही 25 हजार कोटींचा घोटाळा काढलाय, म्हणजे तुम्हालाही वाटेल या अजित पवारला काही हजार कोटींशिवाय जमतच नाही का..?. अहो, मीही तुमच्यासारखा माणूसचं आहे, मलाही भावना आहेत. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, तसेच या घोटाळ्याशी माझा संबंध नसून जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातंय, असेही अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.



























































