
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल वीस तास नॉट रिचेबल असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी दुपारी थेट पत्रकार परिषदेत अवतरले आणि तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याचे कारण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. मी तुम्हाला लिहून देतो की, अजित पवार हे नाव नसते तर शिखर बँकेच्या प्रकरणात केसही उभी राहिली नसती आणि गुन्हाही दाखल झाला नसता, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शुक्रवारी संध्याकाळी आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी राष्ट्रवादीत आणि राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण त्यांना शोधत होते, पण अजितदादा ‘नॉट रिचेबल’ होते. रात्री पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी दादांच्या राजीनाम्याचे कारण सांगितले, पण त्यासोबत त्यांच्या राजकीय संन्यासाचे संकेतही दिले. तब्बल वीस तासांनंतर अजित पवार आज सकाळी काकांच्या घरी पोहचले आणि प्रसारमाध्यमांची पुन्हा एकदा धावपळ उडाली. शरद पवार यांच्या घरी सुरुवातीला कौटुंबिक बैठक झाली आणि नंतर अजितदादा पत्रकारांना सामोरे गेले.
मागील खेपेस सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला, तेव्हाही मी अस्वस्थ झालो होतो. मागील पाच वर्षापासून त्याची चौकशी सुरू आहे, अजून संपत नाही. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आमच्यावरच पुन्हा 25 हजार कोटींचा ठपका, आम्ही पण माणसे आहोत. आम्हालाही भावना आहेत की नाही? असे म्हणताना अजितदादांच्या भावनांचा बांध फुटला आणि भर पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले.
12 हजार कोटींच्या ठेवी असताना 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा?
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना सहकारी मंत्र्यांनी विधिमंडळात भाषण करताना एक हजार 88 कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचे सांगितले होते, पण 25 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. बँकेत दहा ते बारा हजार कोटी रुपयांच्या ठेवी असताना 25 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा झाला, असा प्रश्न करत अजित पवार यांनी राजकीय द्वेषापोटी या प्रकरणात नाहक आपल्याला गोवण्यात आल्याची टीका केली.
भावना दुखावल्याबद्दल माफी
शुक्रवारी सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांना वेदना झाल्या. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना असाच राजीनामा देण्याचा प्रसंग आला होता. आता राजीनामा देण्यापूर्वी आमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले असते तर त्यांनी राजीनामा देऊ नको असेच सांगितले असते. त्यामुळे नेत्यांच्या, पदाधिकऱयांच्या, कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो असे अजित पवार यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.
अस्वस्थ होऊन राजीनामा
आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव राज्य शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात आल्यामुळे अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांच्या या वयात त्यांची बदनामी होत होती त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. माझ्यामुळे पवारसाहेबांना बदनामी सहन करावी लागत होती त्यामुळे राजीनामा दिला. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला पद दिले, मानसन्मान दिला त्या पक्षाच्या विरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवार कुटुंबीयांची बदनामी
या बँक प्रकरणातील सत्तर संचालकांमध्ये अजित पवारांचे नाव नसते तर हे प्रकरण पुढे आणले गेले नसते. केवळ मलाच लक्ष्य केले जात आहे. माझे नाव असल्यानेच शरद पवार यांचे नाव गोवले जात आहे. वास्तविक शरद पवार हे बँकेच्या संचालक पदावर नव्हते, सभासदही नव्हते. निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभागही नव्हता. त्यांचा काहीही संबंध नव्हता तरीही त्यांचे नाव गोवण्यात आले. यामध्ये पवार कुटुंबीयांना बदनाम केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
या वर्षी बँक 285 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात
ही शिखर बँक आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतचे लोकप्रतिनिधी व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या बँकेचे प्रतिनिधित्व करतात. बँकेवर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख तसेच गोयल आणि सुधीर श्रीवास्तव यांच्यासारख्या सनदी अधिकाऱयांनी बँकेवर काम केले. राज्यात दुष्काळ पडला तर आऊट ऑफ द वे जाऊन मदत करावी लागते. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह धनंजय महाडिक, विनय कोरे तसेच कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्यांनाही मदत केली होती याची आठवण यानिमित्ताने अजित पवार यांनी करून दिली. कारखाने अडचणीत आल्यास सरकार किवा नाबार्ड शून्य टक्क्याने कर्ज देते. हे सर्व कर्ज फिटले आहे. यंदा ही बँक 285 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहकलह नाहीच
पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नसल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले, मी राजकारणात आलो तेव्हाही असेच बोलले गेले की, माझा वेगळा गट आहे. सुप्रिया असेल, पार्थ असेल आणि आता रोहित असेल. प्रत्येक वेळी हेच बोलले जाते. पण पवार परिवार हा मोठा परिवार आहे. आमच्याकडे कुटुंबप्रमुख जो निर्णय घेतो त्यावरच सगळे अंमलबजावणी करतात. आमच्यात कधीही गृहकलह नव्हता. आतादेखील शरद पवार यांनी मला सांगितले आहे की, मी जो निर्णय घेईन त्यानुसारच तुला काम करावे लागणार आहे. माझी तेव्हा तर त्यांच्या डोळय़ांत बघण्याचीही हिंमत झाली नाही. ते जे सांगतील त्यानुसारच मी काम करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीतून लढणार
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार राजकीय संन्यास घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता अजित पवार यांनी, ‘पकारसाहेब म्हणाले की, तुला बारामती लढकाकी लागेल.’ ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत. ते सांगतील तेच मी करणार असे सांगितले. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतल्याकर ‘अजित, तुझे मी ऐकून घेतले आहे. त्यामुळे आता मी सांगेन ते तुला करावे लागेल’ असे सांगत अजितदादांनी आपण बारामतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले.
दोन तास कौटुंबिक बैठक
अजितदादांच्या राजीनामा नाटय़ानंतर शनिवारी सिल्व्हर ओक बंगल्यावर पवार कुटुंबीयांची कौटुंबिक बैठक झाली. अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यावेळी उपस्थित होते. डेंग्यूने आजारी असतानाही बहीण खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा हजर राहिल्या होत्या. मात्र रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत कुटुंबप्रमुख शरद पवार यांनी अजित पवार यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली.



























































