
जासई गावाजवळील एका दगडखाणीच्या कार्यालयात घुसलेल्या एका विषारी सहा फुटी नागाला सर्पमित्र आनंद मढवी यांनी पकडून त्याला जीवदान दिले.
रविवारी सकाळी जासई येथिल दगडखाण मालक मनोहर म्हात्रे यांच्या दगडखाणी जवळील कार्यालयात भलामोठा साप घुसल्याची खबर चिर्ले येथिल सर्पमित्र आनंद मढवी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ज्या कार्यालयात साप घुसला होता तेथे धाव घेतली. आनंद मढवी यांनी साप लपलेल्या जागेची पाहणी करून अडगळीत लपलेल्या सापाला मोठ्या शिताफीने पकडले.
सुमारे सहा फूट लांबीचा हा अत्यंत विषारी जातीचा नाग असल्याचे आनंद मढवी यांनी स्पष्ट केले.साप आपला शत्रू नसून तो आपला मित्र असल्याचे सांगून तो निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करतो म्हणून त्याला कधीच मारू नका असे आवाहन आनंद मढवी यांनी सापाला पकडल्यावर तिथे उपस्थित नागरिकांना केले. हा विषारी नाग पकडण्यासाठी त्यांना दिलीप मढवी, सुमित मढवी व पंकज घरत यांनी सहकार्य केले.तद्नंतर त्यांनी पकडलेल्या नागराजाला जंगलात सोडून दिले.





























































