पुराच्या पाण्यात तरुणीचं फोटोशूट, नेटकरी संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये सध्या पुराने थैमान घातलं आहे. 66 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 19 तुकड्या कार्यरत आहेत. अशा या पुरात एका तरुणीचे फोटोशूट व्हायरल होत आहे.

पुराच्या पाण्यात उभं राहून या तरुणीने फोटोशूट केलं आहे. बिहारची राजधानी पाटणा इथे आरती सिंह नावाच्या तरुणीने फोटोशूट करून बिहारच्या या समस्येवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हे फोटोशूट करणाऱ्या सौरभ अनुराज नावाच्या फोटोग्राफरने हे फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. लोकांनी पूरग्रस्तांना मदत करावी असा संदेश देण्याचा सौरभ अनुराजचा हेतू होता.  काही नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं तर काही नेटकऱ्यांना त्याची ही संकल्पना फारशी आवडली नाही.

 नेटकऱ्यांनी सौरभला यावरून ट्रोलही केलं. पूरजन्य परिस्थिती इतकी भयंकर असताना अशा प्रकारे फोटोशूट करणं चुकीचं आणि संवेदनाहीन असल्याचं काहींचं म्हणणं आहे. असं शूट करून पूरग्रस्तांची खिल्ली उडवत असल्याची टीकाही काही नेटकऱ्यांनी केली आहे.